हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यामुळे राज्यात अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. या दोन्ही गटांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि चिन्हावर आपला हक्क दाखविला जात आहे. त्यामुळे आता हे प्रकरण थेट निवडणूक आयोगाच्या दारात गेले आहे. मुख्य म्हणजे, या सर्व घडामोडी सुरू असताना अजित पवार यांच्या गटात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्याचबरोबर, जयंत पाटील (Jayant Patil) अजित पवार गटात आल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री करण्यात येईल असे देखील म्हटले जात आहे. दरम्यान, या सर्व चर्चांवर आता खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना एका पत्रकाराकडून सुप्रिया सुळे यांना अजित पवार यांच्याकडून जयंत पाटील यांना देण्यात आलेल्या ऑफरविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, ” वाह… वाह… चांगली गोड बातमी आहे. अजितदादा गटाकडे गेल्यावर जयंत पाटलांना मुख्यमंत्री करणार असतील तर चांगलंच आहे. ही चांगली गोड बातमी आहे. जयंतराव मुख्यमंत्री होणार असतील तर मला आनंदच होईल”
त्याचबरोबर पुढे बोलताना सुप्रिया सुळे यांनी केंद्रावर देखील टीका केली. यावेळी, “राज्यातील आणि केंद्रातील सरकार हे विरोधकांना संपवायला निघालं आहे. अदृश्य शक्ती आहे. यात डाऊट नाही. दिल्लीची अदृश्य शक्ती आहे. ही अदृश्य शक्ती महाराष्ट्राच्या विरोधात कटकारस्थान करत आहे. मग शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा देवेंद्र फडणवीस या तिघांविरोधात ही अदृश्य शक्ती कट कारस्थान करत आहे” असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
दरम्यान, अजित पवार गटात जयंत पाटील गेल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री बनवण्यात येईल या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. यावर स्वतः जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे, “महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्र्यांची गर्दी फार वाढायला लागली आहे. इकडून तिकडे गेल्यावर मुख्यमंत्री… तिकडून इकडे आल्यावर मुख्यमंत्री… इकडे दोन-तीन मुख्यमंत्री… तिकडे दोन-तीन मुख्यमंत्री… आणि रांगेत आणखी बरेच मुख्यमंत्री… त्यामुळे हे सगळं प्रकरण जनतेला मनोरंजनाचं वाटत असेल, असं मला वाटतं” असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे.