हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचालींना चांगलाच वेग आला आहे. अजित पवारांच्या समावेशामुळे शिंदे गटातील आमदार नाराज असल्याच्या चर्चाही सुरु आहेत. अशातच आज अमरावतीमध्ये पत्रकार परिषद घेऊन प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आपली मंत्रीपदाबाबतची भूमिका जाहीर केली आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गुलाम बनून राहील असे बच्चू कडू यांनी स्पष्ट सांगितले आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी मंत्रिपद दिल्याने त्यांचेही आभार बच्चू कडू यांनी मानले. बच्चू कडू यांच्या २ वेगवेगळ्या विधानाने चर्चाना उधाण आलं आहे.
पत्रकार परिषदेत बोलत असताना बच्चू कडू म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिले आहे. त्यामुळे आम्ही आयुष्यभर त्याचे गुलाम बनून राहू. तसेच राजकारणाला कंटाळून आम्ही मंत्रिपदाचा दावा सोडणार होतो. मात्र आता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन मी निर्णय घेणार आहे. १७ तारखेला मी त्यांना भेटून माझा निर्णय १८ तारखेला जाहीर करणार आहे. त्याचबरोबर, “या सरकारसोबत अशा पद्धतीने मी जाणार नाही हे मी ठाम ठरवले आहे. पद घेण्यापेक्षा सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करायची माझी इच्छा आहे. आता मुख्यमंत्री पेचात असताना त्यांना मदत करण्याचा माझा निर्णय आहे. आम्हाला अजित दादा किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याशी काहीच घेणं देणं नाही.” असा टोला देखील कडू यांनी लगावला आहे.
तत्पूर्वी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही आभार मानल्याने चर्चाना उधाण आलं. महाविकास आघाडीत मला मंत्रिपद दिल्याने मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो. आम्हाला अनेकवेळा अनेकांनी आमिष दाखवले तरीही आम्ही आमच्या निर्णयावर ठाम राहिलो. आम्हाला जर ठाकरे यांनी दिव्यांग मंत्रालय दिले असते तर गुवाहाटीला जाण्याची वेळच आली नसती अशी खंत मात्र त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रीपदामुळे बच्चू कडू नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आज सकाळीच त्यांनी आपण आज ११ वाजता निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. अखेर त्यांनी ११ वाजता पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका जाहीर केली आहे. तसेच आपण एकनाथ शिंदेंबरोबरच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.