सारं काही पोटासाठी | मेघना देशमुख
आईचे लाडके चिरंजीव-चिरंजीवी म्हणून तुम्ही घरीच असाल तर साधारण महिन्यातून एक ते दोनदा इडली खाण्याचा योग येतो. तुम्ही कॉलेज आणि नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी असाल तर इडली चुरायचा योग आठवड्याला येणार म्हणून समजा..!! रोज वेगळं तरी किती खायचं..मग किमान आवडीची असलेली इडली आठवड्यातून एकदा तरी वाट्याला येतेच. इडली-सांबर किंवा इडली चटणी हा पचायला हलका असलेला पदार्थ प्रादेशिक विविधतेनुसार वेगळी टेस्ट जिभेवर टाकून जातो. अर्थातच इडलीचं पीठसुद्धा मॅटर्स..!! लॉकडाऊन काळात घरात असलेले लोक विविध पदार्थ बनवण्याचा जीवापाड प्रयत्न करत आहेत. स्वतः असे पदार्थ बनवल्याचा आनंद शेवटी काही औरच..!! बऱ्याचदा असं होतं की एखादा पदार्थ गरजेपेक्षा जास्त बनवला जातो किंवा घरातील मंडळींच्या आवडीचे ताल असल्याने काही पदार्थ टाकून द्यायची वेळ येते. आता इडलीच्या बाबतीत असं होत असेल तर काय करायचं..?? किंवा ठरवून जरी इडलीपासून वेगळा पदार्थ बनवायचं तुमच्या कधी डोक्यात आलंय का? नसेल तर टेन्शन नको..!! मी आहे ना..!! या इडल्या परत तशाच चविष्ट बनवण्यासाठी मी घेऊन आलेय खास इंडो-चायनिज फ्युजन रेसिपी “इडली – मंच्युरियन”. बाहेरचं चायनिज खाणाऱ्या लहान मुलांना आणि नेहमीच्या, त्याच त्याच चवीची इडली खाऊन कंटाळलेल्यांना हा पदार्थ म्हणचे एक पर्वणीच आहे. चला तर मग झटपट बघूया काय आहे ही रेसिपी.
साहित्य :-
4 इडली
1 वाटी उभा व बारीक चिरलेला कोबी
1/ 2 वाटी चिरलेली शिमला मिरची
2 चमचे बारीक चिरलेला कांदा
2 चमचे चिरलेली कांद्याची पात
1 वाटी तेल
4 चमचे कॉर्नफ्लोअर
1 कप पाणी
1 चमचा शेजवान चटणी
1 चमचा व्हिनेगर
प्रत्येकी 1 चमचा सोया सॉस,ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस.
टोमॅटो सॉस
चवीसाठी मीठ
कृती :- प्रथम प्रत्येक इडलीचे समान काप करून घ्या. त्यासाठी 1 इडली घेऊन तिला मधोमध 1 उभा काप द्या. नंतर आडवे 3 कप देऊन तिचे 6 समान तुकडे करून घ्या. अशाप्रकारे सगळ्या इडल्यांचे काप करा. ह्या तुकड्यांवर 2 चमचे कॉर्नफ्लोअर पसरून त्यात घुसळून घ्या. यामुळे इडलीचे तुकडे निघणार नाहीत आणि मंच्युरियनही कुरकुरीत होतात. आता कढईमध्ये तेल गरम करा. कमी आचेवर हे काप तळून घ्या. तळल्या नंतर हे काप टिशू पेपरवर काढून घ्या.
यानंतर पॅनमध्ये 2 चमचे तेल घ्या. तेल गरम झाल्यावर त्यावर कांदा परतून घ्या. त्यात कोबी आणि शिमला मिरची घालून 2 मिनिट परता. त्यात 2 चमचे कॉर्नफ्लोअर व 2 चमचे पाणी हे मिश्रण घाला. वरील सर्व मिश्रणावर सॉस पसरा. चवीसाठी आवश्यकतेनुसार मीठ घाला.1 चमचा व्हिनेगार घालून हे मिश्रण परतुन घ्या. तुम्हाला जर थोडासा अजिनोमोटो आणि लाल रंग घालायचा असेल तर तोही तुम्ही घालू शकता.
आता या मिश्रणात इडलीचे तळलेले काप घाला. ते चांगले परतून घ्या. यात 1 चमचा शेजवान चटणी घालून या मिश्रणाच्या पॅनवर 2 मिनिट झाकण ठेवा. हे मिश्रण 2 मिनिट शिजल्यावर एका डिशमध्ये काढून त्यावर कांद्याची पात व टोमॅटो सॉसचे गार्निशिंग करून सर्व्ह करा.
मेघना देशमुख यांना पाककलेची आणि रांगोळी काढण्याची विशेष आवड असून याच्या ऑर्डर्सही त्या घेतात. लॉकडाऊन पश्चात अनेकांना घरगुती व्यवसाय मदत करतील या हेतूने त्या पाककलेमार्फत लोकांशी जोडले जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा संपर्क – 8698163195
अशाच नवनवीन पाककृतींसाठी हॅलो महाराष्ट्रला like आणि subscribe करा. मिळवा लेटेस्ट, मुद्देसूद आणि खात्रीशीर बातम्या.