हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील श्रीलंका बेट गेल्या सात दशकांतील सर्वात तीव्र आर्थिक संकटात सापडले आहे. दरम्यान, देशातील नागरिकांनीही आक्रमक पवित्रा घेतला. अध्यक्ष राजपक्षे यांच्या विरोधात घोषणा देत हजारो लोक कोलंबोत एकत्र आले. तर आंदोलकांच्या भीतीने अध्यक्ष गोताबया राजपक्षे भीतीने शुक्रवारीच घरातून पसार झाले. यावरून तृणमूल काँग्रेसचे आमदार इदरिस अली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्थिती होईल,” असे विधान इदरिस अली यांनी केले आहे.
11 जुलैला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते कोलकातामधील सियादलाह मेट्रो स्थानकाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमासाठी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना आमंत्रित करण्यात आलेले नाही. यावरून इदरिस अली यांनी मोदींवर टीका केली आहे. ते म्हणाले की, ममता बॅनर्जी यांनी रेल्वेमंत्री असताना मेट्रोचा प्रकल्प सुरु केला होता, त्यामुळे त्यांना आमंत्रित न करणे हा भेदभाव आहे. उद्घाटन समारंभासाठी राज्य सरकारमधील कोणत्याही व्यक्तीला आमंत्रित न केल्याने तृणमूलचे नेते संतापले आहेत.
याआधी अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या अधिकृत कार्यक्रमातून ममता बॅनर्जी यांना वगळण्यात आले होते. तृणमूल काँग्रेसने याला प्रत्युत्तर देत केंद्र सरकार फूट पाडण्याचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर आता 11 जुलैला कोलकातामधील सियादलाह मेट्रो स्थानकाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी ममता बॅनर्जी यांना आमंत्रित करण्यात आलेले नसल्याने तृणमूल काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत.