Friday, June 2, 2023

सिल्वर ओक हल्ल्यात पक्षातील कोणाचा सहभाग आढळल्यास खासदारकीचा राजीनामा : खा. रणजिंतसिंह

फलटण | खा. शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार कोण आहे, हा चौकशीचा विषय आहे. ज्या पद्धतीचा हल्ला पवार कुटुंबीयांवर झाला तो निषेधार्ह आहे. या हल्ल्यामागे भाजपच्या कोणाचे षडयंत्र जर निघाले तर मी राजीनामा देईन, अशा शब्दात भाजपाचे खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

खा. रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, सिल्वर अोक येथे हल्ल्यावेळी खा. सुप्रिया सुळे पुढे आल्या नसत्या तर कदाचित दुर्घटना देखील घडली असती. टीव्हीवर त्याचे चित्र पाहताना अंगावर काटा उभा राहत होता. अशा भ्याड हल्ल्याचा मी जाहीर निषेध करतो. समाजामध्ये काम करताना काही मतभेद होत असतात. काही कामे आज होतात, काही होत नाहीत.

पण एखाद्याच्या कुटुंबावर हल्ला करणे हा पर्याय नाही. तुम्हाला न्याय मागण्यासाठी न्यायालय, पोलिस ठाणे यासह अन्य पर्याय आहेत. एखाद्याचा निषेध करावयाचा असेल तर त्याला काळे झेंडे दाखवू शकता. पवारसाहेब व आम्ही किती जरी राजकीय विरोधक असलो तरी ते महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यामुळे त्यांचा आम्हाला आदर आहे. या हल्ल्यामागे निश्‍चित काही तरी षडयंत्र आहे. कोण आहे ते चौकशीतून समोर येईल. परंतु यामध्ये भाजपचा हात असल्यास आपण खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचे खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी सांगितले.