हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस अध्यक्षपदासाठी काउंटडाउन सुरु झालं आहे. येत्या 20 सप्टेंबर पर्यंत नव्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. काँग्रेस अध्यक्षपद गांधी घराण्यातच राहणार की बिगर गांधी परिवारातील व्यक्तीच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार हे लवकरच स्पष्ट होईल. राहुल गांधी अजूनही अध्यक्ष होण्यास नकार देत आहेत. त्यातच अशोक गहलोत यांचे नाव अध्यक्षपदासाठी समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारलं असता, अशोक गहलोत अध्यक्ष झाले तरी काही अडचण नाही असं म्हंटल आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, खर तर ही पक्षाची अंतर्गत बाब आहे. राहुल गांधींना पक्षाध्यक्ष व्हायचे नाही, हे माध्यमांतून समोर येत आहे. जर राहुल गांधी यांनी नकार दिला तर अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्ष होऊ शकतात. गेहलोत अध्यक्ष झाले तरी काही अडचण नाही. काँग्रेसमध्ये लोकशाही आहे. पक्षाच्या अध्यक्षपदी जो एकमताने निवडला जाईल त्याच्या पाठीशी काँग्रेस उभी राहील, असेही ते म्हणाले
यावेळी नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपचे देशभरातील राजकारण एका कुटुंबाच्या जोरावर चालते, असा आरोप केला. घराणेशाही वरून आमची खिल्ली उडवणाऱ्यांचे नागपुरात एक कुटुंब आहे. त्या कुटुंबाच्या जोरावर भाजपचे देशभरातील राजकारण चालते असेही नाना पटोले म्हणाले.