ग्राहकांची फसवणूक झाल्यास ग्राहक मंचाकडे तक्रार करावी- मिलींद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके
ग्राहकांच्या हिताचे निर्णय शासन तर घेतलच आहे, परंतु एकाद्या ग्राहकांची फसवणुक झाल्यास ग्राहकाने जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार करावी. तक्रारीची पडताळणी करुन ग्राहकांना न्याय दिला जाईल, असे प्रतिपादन जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष मिलिंद पवार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष श्री. पवार बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, हिंदुस्थान पेट्रोलियमचे प्रभात कुमार, भारतीय मानक ब्युरोचे प्रज्योत दहीकर, सह जिल्हा पुरवठा अधिकारी अमर रसाळ, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे शासकीय व अशासकीय सदस्य तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा ग्राहक मंचाचे काम संपूर्ण पणे मराठीत चालते असे सांगून श्री. पवार म्हणाले, आजचा राष्ट्रीय ग्राहक दिन हा ग्राहकांना त्यांच्यासाठी असणारे हक्क व कर्तव्याची जाणीव करुन देणारा कार्यक्रम आहे. आज अनेक संघटना ग्राहकांसाठी काम करीत आहेत. या संघटनांनी ग्रामीण भागात ग्राहकांसाठी असणाऱ्या हक्काची व कर्तव्याची जनजागृती करावी. ग्राहकांसाठी कायद्यात अनेक तरतुदी आहेत. ग्राहकांची फसवणूक झाल्यास तक्रार दाखल करावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रत्येक नागरिक हा ग्राहक असून ग्राहकांची व्याप्ती मोठी आहे. ग्राहकांचे हक्क व कर्तव्य याची जाणीव करुन देण्यासाठी 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो. कोणतेही वस्तु खरेदी केल्यानंतर पावती घ्यावी आपण पैसे देवून सेवा खरेदी करत असतो. ग्राहकांना त्यांचे अधिकार व कायद्याची माहिती व्हावी हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे प्रास्ताविकात जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते-किसवे यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमा प्रारंभी कन्याशाळा सातारा येथील विद्यार्थीनींमार्फत जागो ग्राहक जागो या विषयावर पथनाट्य सादर केले.