नवी दिल्ली । भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. प्रत्येक मुद्द्यावर तो खुलेपणाने आपले मत मांडतो. कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात गंभीरच्या महेंद्रसिंग धोनीसोबतच्या नात्याबद्दल विविध प्रकारच्या बातम्या समोर आल्या होत्या. या दोघांमध्ये तणाव असून त्यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता गंभीरने धोनीसोबतच्या आपल्या नात्याबद्दल मोठी गोष्ट सांगितली आहे. गंभीरने म्हटले आहे की, मला धोनी आवडत नाही मात्र जेव्हा गरज असेल तेव्हा तो त्याच्या पाठीशी उभा राहणार आहे.
गौतम गंभीरने स्पोर्ट्स प्रेझेंटर जतीन सप्रूच्या यूट्यूब शो ‘ओव्हर अँड आऊट’मध्ये महेंद्रसिंग धोनी आणि स्वतःमधील मतभेदाचे दावे फेटाळून लावताना म्हटले की,” यष्टीरक्षक फलंदाज धोनीबद्दल मला खूप आदर आहे.” जेव्हा गंभीरला विचारण्यात आले की, अशा गोष्टी अनेकदा समोर येतात की गौतम गंभीर महेंद्रसिंग धोनीला आवडत नाही? यावर गंभीर म्हणाला,” या सर्व गोष्टी मूर्खपणाच्या आहेत. मी त्याचा खूप आदर करतो. मी तुमच्या चॅनेलवर हे सांगू शकतो. हे मी 138 कोटी भारतीयांसमोरही सांगू शकतो. धोनीला कधी गरज पडली तर देव करो त्याला त्याची कधीच गरज भासली नाही. मात्र तसे झाले तर मी त्याच्या पाठीशी उभा राहणारा पहिला व्यक्ती असेन.”
धोनी एक चांगला खेळाडू असलेला महान माणूस: गंभीर
गंभीर म्हणाला, “त्याने (धोनी) भारतीय क्रिकेटसाठी जे केले आहे. ते खरोखरच अद्भुत आहे. तुमची खेळाकडे पाहण्याची पद्धत वेगळी असू शकते आणि माझी वेगळी असू शकते. जेव्हा तो कर्णधार होता, तेव्हा मी उपकर्णधार होतो आणि मी कदाचित त्याचा कर्णधार म्हणून सर्वात जास्त काळ उपकर्णधार होतो. आम्ही नेहमीच संघासाठी खेळलो. तो एक महान खेळाडू आहे आणि एक माणूस देखील आहे.”
‘धोनीने तिसऱ्या क्रमांकावर खेळताना मोडले असते अनेक विक्रम’
भारताचा माजी सलामीवीर पुढे म्हणाला की,”धोनीने आपल्या कारकिर्दीत नंबर-3 वर फलंदाजी केली असती तर त्याने अनेक विक्रम मोडले असते. याचा पुरावा म्हणजे धोनीच्या नंबर-3 वरच्या अनेक शानदार खेळी. धोनीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना वनडेतील पहिले शतक झळकावले. त्याने 2005 मध्ये विशाखापट्टणम एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 3 व्या क्रमांकावर 148 धावांची धडाकेबाज खेळी खेळली होती. त्याच वर्षी, श्रीलंकेविरुद्ध, त्याने जयपूर एकदिवसीय सामन्यात क्रमांक-3 वर नाबाद 183 धावा केल्या, जी त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.