हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| स्त्री भ्रूणहत्येचे वाढते प्रमाण लक्षात घेत ते रोखण्यासाठी सरकारने पंतप्रधान मातृवंदना योजनेची (Matru vandana Yojana) घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत दुसऱ्या अपत्य मुलगी झाल्यास महिलांना 6 हजार रुपये देण्यात येणार आहेत. यापूर्वी केंद्र सरकारकडून पहिल्या आपत्यासाठी पाच हजार रुपयांची मदत करण्यात येत होती. मात्र आता सरकारने आणखीन एक पाऊल उचलत दुसरे अपत्यही मुलगी झाल्यास तिला देखील सहा हजार रुपये रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेचा लाभ कोणाला?
या योजनेचा लाभ आर्थिक उत्पन्नावर ठरवण्यात आला आहे. त्यानुसार ज्या महिलेच्या कुटुंबाचे आर्थिक वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच 18 ते 55 वयोगटातील महिला मातृवंदना योजनेसाठी पात्र असतील.
जुळी मुले झाल्यास?
या योजनेअंतर्गत अशा महिलांना देखील लाभ घेता येईल ज्या महिलांना दुसरे अपत्य जुळे झाले आहे, आणि त्यात दोन्ही मुली आहेत. किंवा दुसरे अपत्य जुळे झाले आहे आणि त्यातील एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तर अशा महिलांना एकाच मुलीसाठी ठरलेली रक्कम देण्यात येईल.
अर्ज कुठे करायचा?
मातृवंदना योजनेचा ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांनी, https://wcd.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा. याठिकाणी या योजनेसंदर्भात सर्व माहिती देण्यात आली आहे.