बीड : मराठा आरक्षणाचा मुद्दा आता जोर धरत आहे. सुप्रीमकोर्टाने पुनर्विचार याचिका फेटाळल्यामुळे मराठा समाजात आता आक्रोश निर्माण झाला आहे. मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे राज्यभर दौरा करत आहेत. यासाठी संभाजीराजे शनिवारी बीड जिल्हा दौऱ्यावर होते.
या दौऱ्या दरम्यान संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी संभाजीराजेंना प्रश्न विचारला. ‘मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा अशी मागणी आपण का करत नाही?’ त्यावर संभाजीराजे म्हणाले, ‘प्रश्न विचारायचे असतील तर मला मुख्यमंत्री करा’.त्यामुळे संभाजीराजे यांच्या मनात नेमके काय चालले आहे यावर चर्चा होत आहे. यावर प्रत्युत्तर म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे म्हणाले, मला त्यांना सांगायचंय, की तुम्ही पहिल्यांदा भाजप सोडा आणि संभाजी ब्रिगेडमध्ये प्रवेश करा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करायला तयार आहोत, असं प्रत्युत्तर भानुसे यांनी खा. भोसले यांना दिलं आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी संभाजीराजेंच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री मुंडे यांनी परळीत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ‘सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही. चळवळ चांगली केली तर चळवळीतील प्रश्नांना यश येतं. त्यामुळे मनात प्रामाणिकपणा असावा, पदासाठी चळवळ करणे कोणाच्याच मनात येऊ नये’, असे मुंडे म्हणाले.