हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अपक्ष आमदार रवी राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. कोणावरही टीका करून प्रसिद्धी मिळवण्याची सवय संजय राऊत यांना झाली असून त्यांनी हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांना विदर्भात आणून दाखवावे. असे आव्हान रवी राणा यांनी राऊतांना दिले आहे.
महाराष्ट्रासह विदर्भात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. मात्र, शिवसेनेचे खासदार संजय राऊत त्यांच्यावर टीका करीत आहे. तसेच अमरावतीच्या मेळघाट परिसरात गेल्या ३ महिन्यात ४९ बालमृत्यू झाले. याकडे मुख्यमंत्री लक्ष देत नसून त्यांनी विदर्भ दौरा केला नाही अस म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर ही टीका केली.
मुसळधार पावसामुळे विदर्भाचं मोठं नुकसान झालं. अमरावतीत देखील पावसामुळे अनेकांची घरे पडली. शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालं. अनेक शेतकरी वाहून गेले, तरी देखील मुख्यमंत्र्यांनी विदर्भाचा दौरा केला नाही, अशी खंत रवी राणा यांनी व्यक्त केली आहे. संजय राऊत तुमच्यात हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांना विदर्भात घेऊन या, असं आव्हान देखील त्यांनी संजय राऊतांना दिलं आहे. संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना विदर्भात आणावे आणि मगच टीका करावी अशा शब्दांत रवी राणा यांनी हल्लाबोल केला.