नवी दिल्ली । सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही सर्वात लोकप्रिय सेवानिवृत्ती बचत योजनांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो लोकं या योजनेत गुंतवणूक करतात. या सरकार-समर्थित योजनेत कमीत कमी रु. 500 आणि जास्तीत जास्त रु. 1,50,000 च्या वार्षिक योगदानासह जवळपास कोणीही गुंतवणूक करू शकतो. PPF ही काही सरकारी-समर्थित अशा बचत योजनांपैकी एक आहे जी कर बचत देतात. तुमचे PPF योगदान, मिळवलेले व्याज आणि मॅच्युरिटीची रक्कम आयटी कायद्याच्या कलम 80C अंतर्गत करमुक्त आहे.
ही सरकार-समर्थित योजना लहान बचत पॉलिसीचाच एक प्रकार आहे आणि ती मुदतपूर्तीच्या वेळी रिटर्नची खात्री देते. म्हणूनच ते गुंतवणूकदारांमध्ये इतके लोकप्रिय आहे. PPF सध्या वार्षिक 7.1 टक्के व्याजदर देते. EPF नंतर जोखीममुक्त बचत योजनांमध्ये हा सर्वाधिक व्याजदर आहे. PPF खातेधारक काही अटींनुसार केवळ 1% वार्षिक व्याजाने त्यांच्या खात्यावर कर्ज देखील घेऊ शकतात.
मॅच्युरिटी पिरियड
PPF खात्याचा मॅच्युरिटी पिरियड 15 वर्षे आहे. मात्र विशिष्ट नियमांनुसार, तुम्ही तुमची रक्कम मुदतीपूर्वी काढून खाते बंद करू शकता. तुम्हालाही PPF मधून मुदतीपूर्वी पैसे काढायचे असतील, तर तुम्हाला खाली दिलेल्या या पाच नियमांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.
PPF खात्याची मॅच्युरिटी 15 वर्षे आहे, मात्र तुम्ही त्यापूर्वीही रक्कम काढू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला किमान 5 वर्षे वाट पाहावी लागणार आहे.उदाहरणार्थ, जर तुम्ही जानेवारी 2022 मध्ये PPF खाते उघडले असेल, तर तुम्हाला मुदतपूर्व पैसे काढण्यासाठी 2027 ची वाट पाहावी लागेल. मात्र, यामध्ये आणखी एक अट आहे.
पाच वर्षे मोजण्याच्या पद्धतीमध्ये खाते उघडण्याचे वर्ष समाविष्ट नाही. म्हणजेच, जर तुम्ही 2022 मध्ये खाते उघडले तर तुम्हाला 2027 ची नव्हे तर 2028 ची वाट पाहावी लागेल. इंडिया पोस्टच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, गुंतवणूकदार 5 वर्षानंतर फक्त एकदाच पैसे काढू शकतात.
तसेच, तुम्ही तुमच्या खात्यातील संपूर्ण रक्कम 15 वर्षापूर्वी काढू शकत नाही. याचा अर्थ असा की, तुम्ही 5 ते 14 वर्षांच्या दरम्यान कधीही रक्कम काढू शकता मात्र तुम्हाला त्या वेळी खात्यात असलेल्या रकमेच्या 100% रक्कम मिळणार नाही.
खात्यातील रक्कम पाचव्या वर्षी 50 टक्क्यांपर्यंत काढता येते.
PPF ही करमुक्त योजना असल्याने, मुदतीपूर्वी पैसे काढताना तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही. तुमच्या PPF खात्यातून मुदतीपूर्वी पैसे काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.