सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
कराड – सातारा मार्गावर बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा, विनापरवाना देशी दारू वाहतूक करणाऱ्या एकावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत एका चारचाकी गाडीसह 2 लाख 99 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी पहाटे 5. 30 वाजता अतित गावच्या हद्दीत अवैध दारू वाहतूकीवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत एक चारचाकी तवेरा गाडी क्रमांक (MH-10-AC-7272) व गाडी चालक अमीर गुलाब मुलाणी याच्यावर कारवाई करण्यात आली.
पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांना काशीळ ते सातारा हायवेवरून लाल रंगाच्या तवेरा गाडीतून देशी दारूचे बॉक्स विक्रीसाठी बेकायदा विनापरवाना वाहतूक करणार असल्याची गोपनीय बातमी मिळाली होती. त्यानुसार सर्व्हिस रोडवर पहाटे साडेपाच वाजता पोलीसांनी सापळा रचून छापा टाकला. या छाप्यात 49 हजार रुपये किमतीचे 17 बॉक्समधील 1076 दारूच्या बाटल्या आढळून आला. पोलिसांनी बेकायदा दारू आणि तवेरा गाडी असा 2 लाख 99 हजार 560 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.