अवैध लाकूड वाहतूक : महामार्गावर तीन ट्रकसह 14 लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | पुणे- बंगळूर महामार्गावर उंब्रज गावच्या हद्दीत अवैध लाकूड वाहतूक प्रकरणी तीन वाहनांवर वनविभागाने कारवाई केली. या कारवाईत 14 लाखाचा मुद्देमालही जप्त करण्यात आला.

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, रात्रीची गस्त घालत असताना उंब्रज- कराड व उंब्रज – पाटण या दरम्यान तीन कारवाई करण्यात आल्या. वनक्षेत्रपाल तुषार नवले, वनरक्षक बी.जी. खटावकर, वनरक्षक यु. एम. पांढरे यांनी संशयित वाहनांची तपासणी केली असता, उंब्रज- कराड मार्गावर उंब्रज गावच्या हद्दीत संशयित वाहन क्रमांक (एमएच- 42- बी- 8114), तर उंब्रज ते पाटण रोडवर वाहन क्रमांक (एमएच- 11- एएल- 4021) व (एमएच -42- बी- 9465) या ट्रकमध्ये ही रायवळ मिश्र प्रजातीचे जळावू लाकूड बिगर पासी वाहतूक करताना आढळून आले.

या वाहनांवर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 42- 2 ब अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. या कारवाईत तीन ट्रक व लाकूड असा 14 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई सातारा उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक महेश झांझुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.