कोरोनाचा पर्यावरणावरील परिणाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

थर्ड अँगल | डिसेंबर २०१९ मध्ये दोन गोष्टी अगदी समांतर घडत होत्या याचे आकलन आज होताना दिसते. इटली सोबत ज्या स्पेन या देशामध्ये सध्या कोरोनाने जास्त बळी घेतलेत आणि तेथील मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे त्याच स्पेनमधील माद्रिद याठिकाणी कॉन्फरन्स ऑफ पार्टीज (CoP) ची हवामान बदलासंदर्भात २५ वी बैठक पार पडली. त्याच वेळी चीनमधील वुहान या शहरात कोव्हीड १९ या नव्या विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाला. या दोन गोष्टींचा एकमेकांशी संबंध जोडण्यास कारण की, २०२० पासून हवामान बदलावरील पॅरिस करार अंमलबजावणी करण्यासंबंधी चर्चा अंतिम टप्प्यात माद्रिद परिषदेत होणे अपेक्षित होते. मात्र अमेरिकेने पॅरिस करारातून माघार घेतल्याने Time For Action अशी संकल्पना असलेली ही परिषद अनिर्णित अवस्थेत संपुष्टात आली आणि एकूणच जागतिक हवामान बदल उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. आज जगामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वदूर पसरत असताना सोशल डिस्टंसिंग हा एकमेव प्रादुर्भाव रोखण्याचा मार्ग असल्याने लॉकडाऊन हा पर्याय बहुतेक राष्ट्रांनी अवलंबलेला दिसतो. साहजिकच यामुळे पर्यावरणावर काही सकारात्मक परिणामही झाल्याचं गेल्या काही दिवसात दिसून आलं आहे. प्रस्तुत लेखात आपण कोरोना विषाणूमुळे पर्यावरणावर झालेला परिणाम यावर चर्चा करणार आहोत.

पंजाबमधील जालंधरमधून दिसणारा हिमालय

कोरोना, हवा प्रदूषण व हवेची गुणवत्ता – विविध देशांमध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बंद झालेले कारखाने, उद्योगधंदे, आस्थापना आणि घरात राहा अशा शासनाच्या आदेशामुळे साहजिकच ऊर्जेचा होणारा कमी वापर, काही ऊर्जा निर्मिती केंद्र अंशतः बंद करणे, विविध वाहनांची वाहतूक कमी होणे, वर्क फ्रॉम होम या सर्वांची परिणीती विविध घातक वायूंचे उत्सर्जन कमी होण्यात झाली. या सर्वांमुळे विविध देशांच्या इंधनाच्या गरजेत घट झाली. परिणामतः कार्बनमोनॉक्साईड, कार्बन डायॉक्साईड, सल्फर व नायट्रोजनचे ऑक्साईडस तसेच इतर हरितगृह वायू अथवा PM २.५ व PM १० यांच्या उत्सर्जनात लॉकडाऊन असलेल्या देशांत लक्षणीयरीत्या घट दिसून येत आहे. भारताचा विचार केला तर जगातील सर्वात मोठया लॉकडाऊनची अंमलबजावणी आज होताना दिसत आहे. साहजिकच त्याचा परिणाम देशातील प्रतिदिन एकूण ऊर्जेची मागणी कमी होण्यात झाला आहे. “हवेच्या गुणवत्तेवरील जागतिक अहवाल २०१९” अनुसार जगातील सर्वाधिक ३० प्रदूषित शहरांपैकी २१ शहरे भारतात आहेत. २०१४ मध्ये भारतात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे राष्ट्रीय हवा गुणवत्ता निर्देशांकाची सुरुवात करण्यात आली. यामध्ये ८ विविध हवा प्रदूषकांच्या आधारे हवेची दैनंदिन स्थिती दर्शविली जाते. २२ मार्च नंतर देशातील विविध शहरांतील राष्ट्रीय हवा गुणवत्ता निर्देशांकात सकारात्मक सुधारणा दिसत आहे.

हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात झालेली घट – लॉकडाऊनमुळे विविध आर्थिक प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झालेल्या आहेत. त्यामुळे इंधनाच्या गरजेत देखील घट झालेली आहे. या सर्वांमुळे मानवनिर्मित प्रक्रियांमुळे होणाऱ्या हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात तात्पुरत्या स्वरूपात का होईना घट झालेली आढळून आली. तसेच जगातील विविध भागात अशाप्रकारे आर्थिक प्रक्रिया ठप्प झाल्याने कोरोनाबाधित सर्वच देशांमध्ये ही उत्सर्जन घट प्रत्ययास येत आहे; मात्र याचा होणारा दीर्घकालीन परिणाम हा अशा प्रकारची महामारी संपुष्टात आल्यानंतर ऊर्जा अथवा इंधनाच्या गरजेत अचानक होणारी वाढ व त्यामुळे वाढणारे उत्सर्जन यावर अवलंबून असेल.
 
ओझोन अवक्षयावर झालेला परिणाम – ओझोनच्या अवक्षयावर देखील कोरोनाचा परिणाम झाला आहे. ओझोन अवक्षय रोखला जात आहे अशा प्रकार प्रकारच्या बातम्या चर्चेत होत्या. मात्र ओझोनचा अवक्षय कमी होणे अथवा रोखणे ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. इतक्या कमी कालावधीमध्ये आपल्याला तो परिणाम दिसू शकत नाही. तसेच सध्या ओझोन अवक्षयामध्ये जी घट झाली आहे ; तो मॉन्ट्रियल प्रोटोकॉलच्या अंमलबजावणीचा परिणाम आहे असे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. सदर चर्चा आणि अफवांचे त्यांनी खंडन केले आहे. तथापि मानवी प्रक्रिया बंद असल्याने मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमध्ये अंतर्भूत “ओझोन अवक्षय करणाऱ्या  पदार्थांच्या” (Ozone Depleting Substances) उत्सर्जनात देखील निश्चितपणे अंशकालीन घट झालेली आहे.
 
कोरोना आणि घनकचरा – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुरुवातीच्या कालखंडात विविध रेस्टॉरंटमध्ये पुनर्वापर करण्याजोग्या वस्तूंपेक्षा युज अँड थ्रो किंवा सिंगल युज गोष्टींचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. जेणेकरून सदर वस्तूंच्या पुनर्वापरादरम्यान त्याचा प्रसार होणार नाही. यामुळे घन कचऱ्यामध्ये देखील वाढ झाली. कोरोनावर उपचार करत असताना दवाखान्यात वापरल्या जाणाऱ्या विविध वैद्यकीय गोष्टी (Medical Items) जसे की तोंडाचे मास्क, सिंगल युज टिशू तसेच इतर वैद्यकीय कचरा यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सदर कचरा जाळून त्याची विल्हेवाट लावावी लागते. यामुळे अशा प्रकारच्या कचऱ्याचे प्रदूषण देखील वाढताना दिसत आहे.
 
कोरोना व गंगा नदी पुनरुज्जीवन – केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्राप्त आकडेवारीनुसार गंगा नदीच्या प्रवाहाच्या परिसरातील अनेक औद्योगिक नगरांमध्ये नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेत लक्षणीयरित्या सुधारणा झालेली दिसून आली. 1986 पासून गंगा ॲक्शन प्लॅन हा कार्यक्रम गंगा स्वच्छतेसाठी राबविला जातो. लॉकडाऊनच्या कालावधीदरम्यान गंगेचा प्रवाह हा संथपणे वाहताना दिसत असून त्यामध्ये विविध घातक रसायने,मृत शरीर,जनावरे यांचे अवशेष, मलमूत्र, सांडपाणी, जुने कपडे अथवा कचरा यांचे प्रमाण देखील कमी झालेले आहे. गंगा किनाऱ्यावर मृत लोकांवर केले जाणारे अंत्यसंस्कार आणि गंगेत सोडली जाणारी राख यामुळे होणाऱ्या जलप्रदूषणात देखील घट झालेली आहे. 

वाराणसीमध्ये गंगा नदीपात्र आता स्वच्छ दिसू लागलं आहे.

उत्तर प्रदेश राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार गंगा नदीच्या पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण (Dissolved Oxygen) हे देखील वाढले आहे. जलीय परिसंस्थेतील सजीवांच्या वाढीसाठी हे विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण महत्वाचे आहे. तज्ञांच्या मते हजारो करोड रुपये खर्च करून जी सुधारणा गंगा नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेत होऊ शकली  नाही ती सुधारणा लॉकडाऊनच्या कालखंडात झाली. गंगा नदीच्या पुनरुज्जीवनाच्या या खुणा आहेत असे समजण्यास हरकत नाही. अर्थातच या बाबीचे यशापयश हे लॉकडाऊन नंतर तेथे प्रदूषणाची नेमकी काय परिस्थिती असेल यावर अवलंबून असेल.
 
कोरोना आणि वन्य प्राणीजीवन – कोरोनामुळे होम क्वारंटाईनची परिस्थिती निर्माण झाल्याने जगभरात वन्यजीवनावर देखील त्याचा परिणाम झाला. सुरुवातीच्या काळात जपानमधील नारा पार्क नावाच्या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी नागरी भागात देखील शिका या हरणांच्या प्रजाती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाल्या. थायलंडमध्ये लो बुरी शहरात मोठ्या संख्येमध्ये माकडे शहरी भागामध्ये पहावयास मिळाली. जसजसे सार्वजनिक ठिकाणी माणसाचे अस्तित्व कमी झाले तसे निसर्गाने त्या ठिकाणांवर आपला हक्क पुनर्स्थापित केला असे म्हणायला हरकत नाही. इटलीच्या किनाऱ्यावर डॉल्फिन येणे, तेल अविवच्या विमानतळावर इजिप्शियन गीज दिसणे ही सर्व त्याचीच उदाहरणे होत. अर्थातच ही बाब दीर्घकालीन नाही. भारताचा विचार केल्यास ऑलिव्ह रिडले ही एक धोक्याच्या उंबरठ्यावर (vulnerable ) कासव प्रजाती ओडिशाच्या समुद्र किनाऱ्यावर आढळते. ही कासवे मोठ्या संख्येने या किनाऱ्यावर प्रजननाच्या कालखंडात येतात. 2019 मध्ये मात्र किनाऱ्यावरील मानवी हस्तक्षेप आणि विविध प्रकारचा कचरा यामुळे किनाऱ्यापासून दूर गेलेली होती. कोरोनामुळे लोकांना जबरदस्तीने घरात बसावे लागत असल्याने गेल्या काही दिवसांत गहिरमाथा किनारा ऋषिकुल्य येथील रॉकरीज याठिकाणी 8 लाखांहून अधिक ऑलिव्ह रिडले कासवांचे पुनरागमन झालेले पाहावयास मिळत आहे. पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील परस्पर आंतरसंबंध म्हणजे परिस्थितीकी होय. त्यामुळे माणसाने स्वतःसोबत  इतर सजीवांचे सहअस्तित्व मान्य करायला हवे ही एक महत्त्वाची गोष्ट याठिकाणी पुन्हा एकदा अधोरेखित झाली. या पृथ्वीवरती फक्त माणसाचा हक्क नसून माणसाने इतर सजीवांसोबत सहअस्तित्वाने राहायला शिकले पाहिजे याची शिकवणच जणू  या घटना आपल्याला देत आहेत. सरतेशेवटी या महामारीच्या संकटातून लवकरात लवकर जग बाहेर पडावे  आणि लॉकडाऊनमुळे सक्तीने दाखवावी लागणारी इतर सजीवांप्रतीची संवेदनशीलता  माणसाच्या जीवनशैलीचा भाग बनून आपण देखील त्यांचे सहअस्तित्व मान्य करूयात हाच आशावाद..!!

ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवं..!!

प्रकृतिः रक्षति रक्षिता
Nature Protects If She Is Protected.
 
लेखन – इंद्रजीत यादव, अतुल कोटलवार. लेखकद्वयी पुण्यातील ‘द युनिक अकॅडमी’ मध्ये अध्यापनाचं काम करतात. पर्यावरण आणि पारिस्थितिकी हे पर्यावरणाच्या अभ्यासासाठी उपयुक्त असलेलं पुस्तकही त्यांनी लिहिलं आहे. त्यांचा संपर्क क्रमांक – 9158854953