नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मंजुरी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी पुढील तीन महिने २४ टक्के योगदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. तसेच उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी मोफत एलपीजीची तिसरा सिलेंडर सप्टेंबर महिन्यापर्यंत सुरूच ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे अशी माहितीही जावडेकर यांनी दिली.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मंजुरी
देशातील गरिबांना मोफत रेशन देण्याच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मंजुरी देण्यात आली असून या योजनेत मिळणाऱ्या इतर धान्यांसोबतच आता लोकांना १ किलो चणेही देण्यात येणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल महिन्यात ७४.३ कोटी इतके लाभार्थी होते. तर त्यात वाढ होऊन मेमध्ये ते ७४.७५ कोटी आणि जूनमध्ये ६४.७२ कोटी इतक्या लोकांना या योजनेचा लाभ देण्यात आल्याचे जावडेकर म्हणाले. याव्यतिरिक्त उज्ज्वला योजनेअंतर्गत आता लोकांना सप्टेंबर महिन्यापर्यंत तिसरा सिलेंडर मिळणार आहे.
ईपीएफ अकाउंटमध्ये २४ टक्क्यांचे योगदान तीन महिन्यांसाठी वाढवले
केंद्र सरकारने ईपीएफ अकाउंटमध्ये २४ टक्क्यांचे योगदान तीन महिन्यांसाठी वाढवले आहे. यात १२ टक्के कर्मचाऱ्यांचे आणि १२ टक्के कंपनीचा हिस्सा असणार आहे. विस्ताराचा कालावधी जून ते ऑगस्ट असा असेल, असेही जावडेकर म्हणाले. या बरोबरच ज्या कंपन्यांमध्ये ९० टक्के लोक १५ हजारांहून कमी पगार घेतात, त्यांचे पीएफ सरकाने भरला असल्याचेही जावडेकर म्हणाले. अशा ३ लाख ६७ हजार उद्योगांना फायदा झाला असून ७२ लाख लोकांना सरकारने उचललेल्या या पावलामुळे फायदा झाल्याचे जावडेकर म्हणाले.
विमा कंपन्यांमध्ये १२४५० कोटी रुपयांच्या भांडवल गुंतवण्याला मंजुरी
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत देशातील सार्वजनिक विमा कंपन्यांमध्ये मोठ्या गुंतवणुक करणायचाही निर्णय घेण्यात आला आहे. ओरिएंटल इंश्योरन्स कंपनी लिमिटेड, यूनायटेड इंडिया इंश्योरन्स कंपनी लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील जनरल इंश्योरन्स कंपन्यांमध्ये १२४५० कोटी रुपयांच्या भांडवल गुंतवण्याला मंजुरी दिली आहे, अशी माहितीही जावडेकर यांनी दिली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”