25 वर्षीय युवतीच्या खून प्रकरणाला वेगळ वळण? ; मृतदेहाजवळ चिठ्ठ्या अन् दोन दारुच्या बाटल्या..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | डोक्यात दगड घालून 25 वर्षीय युवतीचा निर्घृण खून करण्यात आला. कोरेगाव (ता. कराड) येथे सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. उसाच्या फडात युवतीचा मृतदेह आढळला असून संबंधित युवतीच्या ओळखीबाबतची ठोस माहिती रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती लागली नव्हती. एका संशयीताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, त्याच्याकडूनही खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळालेली नाही. परंतु मृतदेहाजवळ एक पिशवी मिळालेली असून त्यामध्ये काही चिठ्ठ्या मिळालेल्य असून दारूच्या रिकाम्या बाटल्याही सापडल्या आहेत. परंतु यावरूनही अद्याप पोलिस अंतिम तपासापर्यंत पोहचलेले नाहीत. तरीही आज मंगळवारी दुपारपर्यंत खूनाचा उलगडा व त्या संदर्भात माहिती पोलिसांनी मिळेल असा विश्वासही व्यक्त अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव गावच्या हद्दीत कार्वे ते कोरेगाव जाणाऱ्या रस्त्यालगत भैरोबा मंदिर आहे. या मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र आहे. सोमवारी सकाळी काही शेतकरी त्याठिकाणी गेले होते. त्यावेळी फडात त्यांना युवतीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी याबाबतची माहिती ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्यासह पथक त्याठिकाणी दाखल झाले. पोलिसांनी पाहणी केली असता युवतीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. मात्र, संबंधित युवती त्या परिसरातील नसल्यामुळे तिची ओळख पटली नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. मृत युवतीचे नाव पोलिसांसमोर आले आहे. मात्र, त्या नावाबाबत ठोस माहिती मिळालेली नाही. त्यामुळे त्या युवतीचे नाव तेच आहे की नाही, हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. तसेच या प्रकरणात एका संशयीतालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, त्याच्याकडूनही ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही. त्याच्याकडेही उशिरापर्यंत पोलीस कसून तपास करत होते. युवतीची ओळख पटविण्यासह मारेकऱ्यांचा तपास करण्याचे आव्हान सध्या ग्रामीण पोलिसांसमोर आहे.

युवतीकडे आढळल्या चिठ्ठ्या

पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता, त्याठिकाणी एक पिशवी आढळून आली. त्या पिशवीमध्ये काही चिठ्ठ्या असून त्यामध्ये मृत्यूस जबाबदार म्हणून काहीजणांची नावे लिहीण्यात आली आहेत. त्या चिठ्ठ्यांमध्ये ज्यांच्या नावाचा उल्लेख आहे, त्यांच्याकडेही पोलिसांनी कसून तपास केला. मात्र, ज्यांची नावे आहेत, तेही संबंधित युवतीला ओळखत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण करण्यासाठी हल्लेखोरानेच या चिठ्ठ्या असाव्यात, असा पोलिसांना संशय आहे.

घटनास्थळी दारुच्या बाटल्या

ऊसाच्या फडात ज्याठिकाणी युवतीचा मृतदेह आढळून आला, त्याठिकाणी पोलिसांना दारुच्या दोन रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. आरोपीने त्याठिकाणी मद्यप्राशन केले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. तसेच आरोपीने गुन्ह्यात वापरलेला दगडही आढळला असून पोलिसांनी तो तपासासाठी जप्त केला आहे.

Leave a Comment