हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेनं एमआयएमसोबत युती करणार नाही असे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. मात्र तरीही इम्तियाज जलील आपले प्रयत्न सुरूच ठेवणार आहेत. त्याचाच भाग म्हणजे ते लवकरच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहणार, असा विश्वास इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला. भाजप हा देशासाठी घातक आहे. भाजप फक्त राजकीय फायद्यांसाठी समाजात द्वेष पसरवत आहे. यामुळे आघाडीसाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. आपण लवकरच शरद पवार व उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन यावर चर्चा करणार असल्याचे जलील यांनी सांगितले.
दरम्यान, एमआयएमने महाविकास आघाडीला प्रस्ताव दिल्यानंतर राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे. शिवसेनेनं एमआयएमसोबत युतीला तीव्र विरोध केला आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत एमआयएम सोबत जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अद्याप ठाम भूमिका मांडली नाही. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली असून याच वरून भाजप नेते वारंवार शिवसेनेवर निशाणा साधत आहेत.