औरंगाबाद – एसटी महामंडळातर्फे काल दिवसभरात 54 एसटी बसच्या 154 फेऱ्या करण्यात आल्या. या बससेवेमुळे तीन हजारांवर प्रवाशांनी प्रवास केला. औरंगाबाद-पुणे मार्गावर 17 शिवशाहीच्या माध्यमातून साडेसहाशे प्रवाशांनी प्रवास केला. 21 चालक आणि 30 वाहक, चार चालक कम वाहक अशा एकूण 55 कर्मचाऱ्यांनी शनिवारी सेवा बजावली. तर महामंडळ प्रशासनाकडून संपकरी कर्मचाऱ्यांवर सुरु असलेल्या कारवाईत काल आणखी पाच जणांना बडतर्फी संदर्भात नोटिसा जारी करण्यात आल्या. त्यामुळे बडतर्फी संदर्भात नोटिसा बजावण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 21 वर गेली आहे.
रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून काही प्रमाणात सेवा पुरवण्यात येत आहे. शनिवारी औरंगाबाद पुणे मार्गावर शिवशाहीच्या 17 बसच्या माध्यमातून 17 फेऱ्या करण्यात आल्या असून 652 प्रवाशांनी प्रवासाचा लाभ घेतला. तर औरंगाबाद नाशिक मार्गावर पाच शिवशाही चालवण्यात आल्या. त्याचप्रमाणे औरंगाबाद आगारातून कन्नड मार्गावर दोन लालपरीने आठ फेऱ्या केल्या, त्यात 22 प्रवाशांनी प्रवास केला. सिल्लोड मार्गावर तीन बसने सहा फेऱ्या केल्या यात 344 प्रवाशांनी प्रवास केला. फुलंब्री मार्गावर सहा फेऱ्या करण्यात आल्या. त्यात 92 प्रवाशांनी प्रवास केला.
औरंगाबाद आगार क्र. 1 मधून सिडको जालना दरम्यान नऊ बसने 18 फेऱ्या केल्या त्यातून २९६ प्रवाशांनी प्रवासाचा लाभ घेतला. त्याचप्रमाणे कन्नड आगारातून औरंगाबाद मार्गावर चार बसने 289 प्रवाशांनी प्रवास केला. गंगापूर आगारातून औरंगाबाद आणि वैजापूर मार्गावर प्रत्येकी एक बस चालवण्यात आली. सोयगाव आगारातून दोन शिवशाही, एक हिरकणी आणि तीन लालपरी बस अजिंठा मार्गावर चालवण्यात आल्या, त्यातून 1260 प्रवाशांनी प्रवास केला. एसटीने एकूण 24 शिवशाही, एक हिरकणी आणि 23 लालपरी चालवून 154 फेऱ्या केल्या, यातून तब्बल 3147 प्रवाशांनी प्रवास केला.