युवकांच्या आत्महत्येनंतर मोबाईलधील रेकाॅर्डिंगमुळे खासगी सावकारीचे कनेक्शन समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | महागाव (ता. सातारा) येथील एका सत्तावीस वर्षीय युवकांने खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याप्रकरणी तीन सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. युवकांच्या मोबाईलमधील काॅल रेकाॅर्ड हाती लागले असून या फोननंतरच मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. महेश माणिक चव्हाण (वय- 27) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

या प्रकरणी गणेश अरविंद गायकवाड, प्रमोद नारायण गायकवाड (दोघे रा. क्षेत्रमाहुली, सातारा) व नीलेश विष्णूपंत तांबोळी (रा. महागाव, ता. सातारा) या तिघांवर आत्महत्येस प्रवृत्तसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मृत महेश चव्हाण यांचे वडील माणिक सोपान चव्हाण (वय- 62,रा. महागाव) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महेश चव्हाण या युवकाने महागाव येथे लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. चव्हाण कुटुंबियांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी टाहो फोडला. पोलिसांनाही या घटनेची माहिती समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवून त्याचे शवविच्छेदन केले. ही सर्व घटना दि. 6 रोजी घडली आहे. चव्हाण कुटुंबिय शोकाकूल असतानाच त्यांना दि. 8 रोजी महेश याचा मोबाईल मिळाला. मोबाईल पाहिला असता त्यांना एक धक्कादायक ऑडिओ रेकॉर्डिंग मिळाले. या रेकॉर्डिंगमध्ये एक सावकार महेश याला अश्लील शिवीगाळ करत आहे. तसेच ‘तू पैसे दिले नाही तर तुझा जीव काढल्याशिवाय राहणार नाही’, अशीही दमबाजी करत आहे. हा फोन दि. 6 रोजी रेकॉर्डिंग झाला असून या घटनेतूनच महेश घाबरला व तो अस्वस्थ झाला व त्याने आत्महत्या केली.

प्राथमिक माहितीनुसार महेश याने संशयित तिन्ही आरोपींकडून मार्च 2020 साली व्याजाने पैसे घेतले होते. पैसे परत देवूनही संशयित परत पैसे मागत होते. ही बाब कुटुंबियांना माहित होती. यातूनच महेश गेल्या काही महिन्यांपासून अस्वस्थ होता. दि. 6 एप्रिल रोजी महेश सायंकाळ झाली तरी घरी आला नाही. यामुळे वडीलांनी त्याचा शोध घेण्यासाठी फोन लावला. महेश फोन देखील उचलत नव्हता. महेशची शोधाशोध सुरु असतानाच त्याने आत्महत्या केल्याचे कुटुंबियांना समजले.

Leave a Comment