झोपड्या पाण्यात : अवकाळी पावसाचा ऊसतोड मजूरांना फटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राज्यासह सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने काल सकाळपासून जोरदार हजेरी लावलेली आहे. अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका हा ऊसतोडणी मजूरांना बसलेला आहे. जिल्ह्यातील गावा- गावात ऊसतोडणीचा हंगाम चालू असल्याने मजूरांनी उभारलेल्या झोपड्यामध्ये पाणी शिरले आहे. ऊसतोड मंजूरांना पावसाच्या पाण्यामुळे रात्र जागून काढावी लागली तर संसार उपयोगी साहित्यालाही फटका बसला आहे.

सातारा जिल्ह्यात कृष्णा, सह्याद्री, अजिंक्यतारा, किसनवीर, बाळासाहेब देसाई, रयत- अथणी, जयवंत शुगर, खंडाळा तालुका सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोडणीसाठी टोळ्या गावा- गावात दाखल झालेल्या आहेत. याचबरोबर गुऱ्हाळघरे आणि खासगी शुगर मिलही सुरू आहेत. या सर्व कारखान्यांचे ऊसतोड मंजूर हे ग्रामीण भागात झोपड्या उभारून राहत आहेत. कालच्या अचानक आलेल्या अवकाळी पावसाचा या ऊसतोड मजूरांना मोठा फटका बसला आहे.

कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथे कृष्णा सहकारी साखर कारखान्यांच्या ऊसतोड मजूरांच्या झोपडीत पाणी शिरलेले आहे. साचलेल्या पाण्यामुळे ऊसतोड मजूरांना रात्र जागून काढावी लागली. तर संसार उपयोगी साहित्याचेही नुकसान झाले आहे. या पावसाचा सर्वात मोठा फटका हा ऊसतोड मजुरांना बसला असून अर्थिक नुकसानही झालेले आहे.

पावसामुळे ऊसतोडणी बंद राहणार

अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. अनेक शेतात जाणाऱ्या मार्गावर चिखल तयार झाला असून ऊसतोडणी वाहने जावू शकत नाहीत. त्यामुळे पुढील काही दिवस ऊसतोडणी बंद ठेवावी लागणार आहे. अवकाळी पावसामुळे ऊसतोडणी बंद, झोपडीत पाणी या गोष्टीमुळे मजूरांचे अर्थिक नुकसान होणार आहे.

Leave a Comment