सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
पुणे- बंगलोर महामार्गावर असलेल्या खंबाटकी बोगद्यात लायटिंग आणि केबल वाहतुकीसाठी लावण्यात आलेला लोखंडी भलामोठा सी चॅनेलचा राॅड अचानक तुटून वाहनांवर कोसळला आहे. राॅड तुटल्याने एका चारचाकी एर्टीगा कारचे मोठे नुकसान झाले असून सांगली- औरंगाबाद बसची काचही फुटली आहे.
घटनास्थळावरू मिळालेली माहिती अशी, सातारा जिल्ह्यातील खंबाटकी बोगद्यात वाहनांची मोठी वर्दळ असते. आज सकाळी पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावर वाहनांना दिसण्यासाठी लायटिंग लावण्यात आले आहे. मात्र, योग्य ती खबरदारी न घेता लावल्याने लायटिंग आणि केबल वाहतुकीसाठी लावण्यात आलेला लोखंडी भलामोठा सी चॅनेलचा राॅड वाहनांवरती कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
— Vishal Vaman Patil (@VishalVamanPat1) June 7, 2022
लोखंडी राॅड तुटून सांगली-औरंगाबाद (क्रमांक- एमएच-14- बीटी- 4855) बसच्या समोरील काचा फुटून मोठे नुकसान झाले आहे तसेच चालकाने सावधानता बाळगल्याने जखमीही झाला नाही. बोगद्याच्या सुरुवातीलाच रोड तुटल्याने येणाऱ्या जाणाऱ्या गाड्याचा या ठिकाणी अपघात होत आहे. याच ठिकाणी लोखंडी रॉडला एर्टीगा कार धडकली. साताऱ्याहून पुण्याला जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाल्याने बोगद्यात एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पावसाळ्याच्या आधी बोगद्यात ही घटना घडल्याने बोगद्याच्या कामाबाबत शंका उपस्थित केली जात आहे. संबंधित विभागाने याची तात्काळ दुरुस्ती करून पुढील अनर्थ टाळण्याची मागणी वाहनचालकांच्यातून केली जात आहे.