मुंबई । भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा वेग अजूनही कायम असून दरोरोज मोठ्या प्रमाणावर कोरोनग्रस्त सापडत आहेत. मागील २४ तासांत देशभरात कोरोनाचे (Coronavirus) ५७ हजार ११७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ७६४ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. गेल्या ३ दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. रुग्णांच्या इतक्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे देशातील आरोग्य यंत्रणांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता १६,९५,९८८ वर जाऊन पोहोचला आहे. यापैकी ५,६५,१०३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत देशातील १०,९४,३७४ लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. परंतु, कोरोनामुळे देशातील ३६,५११ जणांनी प्राण गमावले आहेत. त्यामुळे आता जागतिक यादीत कोरोना मृतांच्या आकडेवारीत भारताने ५वे स्थान प्राप्त करत इटलीलाही मागे टाकले आहे. तर सर्वाधिक रुग्णसंख्येचा विचार करता अमेरिका आणि ब्राझील यांच्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. कोरोना रुग्णांची संख्या अशी वाढत राहिल्यास देशातील आरोग्ययंत्रणा कोलमडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र हे देशातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेले राज्य आहे. गेल्या काही दिवसांत नव्या रुग्णसंख्येचा विचार करता महाराष्ट्राने अनेकदा दहा हजाराचा टप्पा ओलांडला आहे. शुक्रवारी राज्यात कोरोनाचे १०,३२० नवे रुग्ण सापडले आहेत, तर २६५ जणांचा मृत्यू झाला. तर कोरोनातून बऱ्या झालेल्या ७,५४३ जणांना घरी सोडण्यात आले. महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत १४,९९४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील कोरोना मृत्यूदर ३.५५ टक्के एवढा आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”