हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुरुवारी MPSC कडून घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा 2022 ची मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार, विनायक नंदकुमार पाटील राज्यात पहिल्या क्रमांकावर आला आहे. तसेच मुलींमध्ये पूजा वंजारी हिने राज्यामध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. तर धनंजय वसंत बांगर याने मुलांमध्ये दुसरा क्रमांक आणि प्राजक्ता पाटील हिने मुलींमध्ये दुसरा क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे सध्या या चौघांवर देखील राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
महत्वाचे म्हणजे, गुरुवारी दुपारी राज्यसेवेच्या 613 पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर संध्याकाळी लगेच मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली. आता उमेदवारांना 29 जानेवारीपर्यंत पसंतीक्रम द्यायचा आहे. तिथून पुढे अंतिम निकालाची यादी जाहीर करण्यात येईल. दरम्यान, राज्यसेवेच्या 613 पदांसाठी 2022 साली जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तेव्हा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेतून 1800 उमेदवारांना मुलाखतीसाठी निवडण्यात आले होते. याच मुलाखतीचा शेवटचा टप्पा गुरूवारी पार पडला. त्यानंतर संध्याकाळी मेरिट लिस्ट जाहीर झाली.
दरम्यान, एमपीएससीची मेरिट लिस्ट जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. गेल्या अनेक काळापासून विद्यार्थी मेरिट लिस्ट जाहीर होण्याची वाट पाहत होते. अखेर ते गुरुवारी जाहीर झाल्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांची नावे पुढे आली आहेत. या मेरिट लिस्टनुसार, मुलांमध्ये पहिल्या क्रमांकावर, पाटील विनायक नंदकुमार , दुसऱ्या क्रमांकावर बांगर धनंजय वसंत आणि तिसऱ्या क्रमांकावर गावंडे सौरव केशवराव याने बाजी मारली आहे. तसेच, मुलींमध्ये पहिला क्रमांक वंजारी पूजा अरूण, दुसरा क्रमांक पाटील प्राजक्ता संपतराव, तिसरा क्रमांक ताकभाते अनिता विकास हिने पटकावला आहे.