सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा शहरात कोयता गँग पुन्हा सक्रिय झाली असल्याचे दिसून येत आहे. कारण किरकोळ कारणावरून जो – तो कोयता घेऊन हल्ला करत आहे. शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट येथे विजय ओव्हाळ या फळविक्रेत्यावर हल्लेखोरानी कोयत्याने आणि चाकूने सपासप वार केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. हल्यात फळ विक्रेता गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा शहरात प्रतापसिंह नगरमध्ये गेल्या चार दिवसात सोमवारी तिसरी घटना थरारक घटना घडली. बॉम्बे रेस्टॉरंट येथे असलेल्या फळ विक्रेत्यांवर अनोळखी मारेकऱ्यांनी कोयता व चाकुने वार केला. अचानकपणे झालेल्या हल्यात फळ विक्रेता गंभीर जखमी झाला.
हल्यानंतर मारेकरी तेथून पळून गेले. या घटनेनंतर बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीसही घटना स्थळी दाखल झाले असून घटनेचा तपास करीत आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.