सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
सातारा शहराजवळील पुणे- बंगळूर महामार्गावर असलेलल्या शिवराज पेट्रोल पंपनजीक असलेल्या एका हाॅटेलजवळ गोंधळ सुरू होता. सदरचा गोंधळ पाहून पोलिसांनी त्यांना तेथून जाण्यास सांगितल्याने फाैजदारासह पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांपैकी दोघांनी पलायन केले आहे. दरम्यान, सराईत गुन्हेगार अक्षय पवार (रा. रविवार पेठ, सातारा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संतोष ज्ञानोबा शेलार (वय- 38, रा. खेड, ता. सातारा) असे हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार पोलिस संतोष शेलार हे मध्यरात्री रात्र गस्तीसाठी कामावर होते. त्यांच्यासोबत फौजदार वाघमोडे होते. रात्री दीड वाजता दोन्ही पोलिस शिवराज पेट्रोल पंप परिसरातील एका हॉटेलजवळ गेले असता, तेथे काहीजण गोंधळ घालत होते. दोन्ही पोलिसांनी संबंधितांना शांततेचे आवाहन करुन तेथून निघून जाण्यास सांगितले. तेव्हा, संशयित अक्षय पवार व त्याच्या दोन्ही साथीदारांनी पोलिसांना शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. पोलिसांना उद्देशून ‘आम्ही कोण आहे? तुम्हाला सोडणार नाही.’ असे म्हणत धमकी दिली. यावेळी एका संशयिताने तक्रारदार पोलिस यांना थेट धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली.
घटनेचे गांभिर्य ओळखून फौजदार वाघमोडे यांनी पोलिस ठाण्याला फोन करून अधिक कुमक मागवली. तोपर्यंत एका संशयिताने फौजदार यांनाही धक्काबुक्की करत तक्रारदार शेलार यांच्या डोळ्यावर दुचाकीच्या चावीने हल्ला केला. यामध्ये ते जखमी झाले. पोलिसांनी संशयितांची धरपकड करुन त्यांना पोलिस व्हॅनमध्ये बसवले. तरीही संशयित सर्व पोलिसांना शिवीगाळ व दमदाटी करत होते. पोलिस व्हॅन शहर ठाण्यासमोर आल्यानंतर दोन संशयितांनी पोलिसांसमोरच पलायन केले. शनिवारी पहाटे संशयितांवर शासकीय कामात अडथळ्यासह विविध विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.