सांगली | धुळगाव येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण व तासगाव वनविभाग यांनी संयुक्तपणे छापा टाकून बेकायदेशीर मांडूळ बाळगल्याप्रकरणी तनवीर रहामन कामीरकर व फिरोज सलीम मुजावर या दोघांना ताब्यात घेतले.
स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकामार्फत तासगाव विभागातील फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी पेट्रोलिंग सुरू होते. तेव्हा तासगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुळगाव येथे फिरोज मुजावर याच्या शेतीतल शेडमध्ये निळ्या रंगाच्या बॅरेलमध्ये मांडुळ जातीचा दुर्मीळ साप अवैधपणे बाळगला असल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल अजय बेंद्रे यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी तासगाव वनविभाग अधिकारी वनक्षेत्रपाल कौसल्या भोसले यांना सदर कारवाईसाठी बोलवून घेतले.
संयुक्त पथकामार्फत फिरोज मुजावर याच्या शेतात शेडमध्ये छापा टाकला. तिथे तनवीर कामिरकर व फिरोज मुजावर हे दोघेजण आढळले. तेथील शेडमध्ये निळ्या रंगाच्या बॅरेलमध्ये मांडूळ जातीचा दुर्मिळ साप सापडला. सविस्तर पंचनामा करून वनविभाग अधिकारी वनक्षेत्रपाल कौसल्या भोसले यांनी तो जप्त केला. तनवीर कामीरकर व फिरोज मुजावर या दोघांना बेकायदेशीर मांडूळ बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.