नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख
अपक्ष उमेदवार अॅड. माणिकराव कोकाटे यांच्या नावाचे पत्रही व्हायरल झाले आहे. तर छगन भुजबळ यांच्या नावाने खोटी बातमी सोशल मीडियामधून दाखवली जात आहे. या दोन्ही प्रकाराबद्दल छगन भुजबळ व अॅड. माणिकराव कोकाटे यांनी वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या. अॅड.माणिकराव कोकाटे यांच्या नावाने व्हायरल होत असलेल्या पत्रात शिवसेनेचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांना पाठिंबा दिल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे उमेदवारांची चिंता वाढली आहे.
प्रचाराची सांगत झाल्यानंतर सोशल मीडियातून अनेकांनी प्रचार सुरू केला आह. त्यात अनेक फेक मॅसेज धडकू लागले आहेत. अॅड. माणिकराव कोकटे यांचे व्हायरल झालेले पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले असून त्यात त्यांच्या नावाचा जिल्हा बँकेच्या लेटरपॅडचा वापर केला आहे. या पत्रात कोकटे यांची सही सुद्धा आहे. या पत्रातील मजकूरही खरा वाटावा अशी मतदारांची फसगत होण्याची शक्यता आहे. या पत्रात शेवटच्या परिच्छेदात या पत्राद्वारे मी जाहीर करतो की महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध कोणतीही बंडखोरी किंवा अपक्ष लढण्याचा माझा विचार नाही. देशाला विकासासाठी मजबूर नव्हे तर मजबूत सरकराची आवश्यकता असल्याने सर्व कार्यकर्ते आणि नागरिकांनी गैरसमज, राजकीय मतभेद दूर ठेऊन महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनाच भरभरून मतदान करून देशात पुन्हा नरेंद्र व राज्यात देवेंद्र हे स्वप्न साकार करावे, असा मजकूर आहे.
या पत्राबाबत अॅड. कोकाटे यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. यात बनावट लेटर हेडवर माझी सही स्कॅन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने माघार घेतल्याचे बोगस पत्र व्हायरल केले आहे. याबाबत गुन्हा दाखल करावा, असे अॅड. कोकाटे यांनी म्हटले आहे.