हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतीय नागरिकांना चिंतेत पाडणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. थंडीचा मौसम सुरू झाल्यापासून देशांमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. दिल्या 24 तासात 335 लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्याचबरोबर, सक्रिय रुग्णांची संख्या 1701 वर गेली असल्याची माहिती रविवारी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशात कोरोनाचा धोका वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या 5 लाख 33 हजार 316 आहे. यात रिकव्हरी दर 98.81 टक्के इतका आहे. देशामध्ये कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी 220.67 कोटी लसी देण्यात आल्या आहेत. मात्र पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत झाल्यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
दरम्यान, 13 डिसेंबर रोजी केरळमध्ये नवीन कोरोना व्हायरस JN.1 प्रकार आढळून आल्यामुळे खळबळ वाजली आहे. SARS-CoV-2 Genomics Consortium (INSACOG) च्या नवीन डेटाने केरळमध्ये नव्या विषाणूची उपस्थिती उघड केली आहे. मुख्य म्हणजे या नव्या विषाणूची लक्षणे देखील वेगळी असल्याची माहिती नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशन कोविड टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताप, सततचा खोकला, लवकर थकवा, नाक बंद पडणे, नाक वाहणे, जुलाब, डोकेदुखी अशी नवी लक्षणे विषाणूची आहेत.