सांगली | सांगलीतल्या सुंदरनगर वेश्यावस्तीमध्ये वारांगना महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम पार पडला. याला चांगला प्रतिसाद मिळाला. गायन क्षेत्रातील अग्रेसर आरडीएक्स ग्रुपकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आझादी का अमृत महोत्सव आणि माझी वसुंधरा या कार्यक्रमांतर्गत सुंदरनगर मधील महिलांसाठी विविध कार्यक्रम संपन्न झाले. यामध्ये प्रारंभी महापालिकेचे अग्निशमन विभागाकडून चीफ फायर ऑफिसर विजय पवार आणि टीमकडून सुरक्षाविषय घ्यायच्या खबरदारीबाबत महिलांना प्रात्यक्षिकासह माहिती देत जनजागृती केली.
यानंतर आरडीएक्स ग्रुपकडून गाण्यांचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला तर महिलांसाठी विविध गेमही घेणेत आले. महिलांसाठी आरडीएक्स ग्रुपकडून खेळ पैठणीचा कार्यक्रम तसेच संगीत खुर्ची कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये आरडीएक्सच्या सोनाली केकडे, राम नाईक , सुहास फडतरे, अनिस जामदार, प्रताप पवार आणि टीम कडून अत्यंत सुसूत्रपणे खेळ पैठणीचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये वारांगना महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत पैठणी मिळवली.
या कार्यक्रमास विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.एस. पुजारी यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. तसेच महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे आणि सहायक आयुक्त नितीन शिंदे, वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे, स्वच्छता निरीक्षक पंकज गोंधळे यांनीही कार्यक्रमास भेट देऊन वारांगना महिलांचे आत्मबल वाढवत प्रोत्साहन दिले.