सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
जत तालुक्याच्या पश्चिम भागात कृष्णामाई अवतारली. खरे पण या भागात बागायत क्षेत्र वाढल्यामुळे तरसा सारख्या जंगली प्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. बाज येथील वाघमोडे वस्तीवर या तरसाने नुसताच हल्लाबोल केला. यामध्ये दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. जत तालुक्यात गेल्या दहा-बारा वर्षात जतच्या पश्चिम, उत्तर आणि दक्षिणचा काही भागात कृष्णामाई अवताराली आहे. या कृष्णाच्या पाण्याने जवळ पन्नास ते साठ गावातील क्षेत्र ओलीताखाली आले आहे.
या भागातील शेतकऱ्यांनी उसासारखी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. या उसाच्या दाट पिकांनामुळे लांडगे, तरस, कोल्हे इत्यादी जंगली प्राण्यांचा वावर या भागात वाढला आहे. लांडग्यांची तर बेसुमार वाढ झाली आहे. लांडगा आणि कोल्हा हे दोन प्राणी जत तालुक्यात बऱ्याच वर्षापासून असले तरी तरस सारख्या जंगली प्राण्यांचा वावर जत तालुक्यात नव्हता. मात्र या पश्चिम भागातील ऊस पट्टयामुळे या जंगली प्राण्यांचा कमालीचा उपद्रव वाढला आहे.
सुरुवातीस शेळ्या, कुत्री यांच्यावर हल्लाबोल करत आता माणसांवर हल्ला करू लागल्याने या परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाली आहे. पूर्व शेतकरी अगदी बिनधास्तपणे आपल्या रानात फिरत होता. तथापि आता शेतकरी वाढत्या उपद्रवामुळे पुरता गांगंरला आहे. लांडगा थोडा आरडाओरडा केला तर पळून जातो. तथापि तरस यामध्ये मोडत नाही. उलट आक्रमक होऊन माणसांच्या अंगावर हल्ला चढवत असल्याने वन खात्याने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी होताना दिसत आहे.