हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अखेर मंगळवारी औपचारिकरित्या महाविकास आघाडीमध्ये (Mahaviaks Aaghadi) वंचित बहुजन आघाडीचा (VBA ) समावेश करण्यात आला आहे. याबाबत महाविकास आघाडीकडून अधिकृत पत्र जाहीर करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वंचितला आघाडीत घ्यायचे की नाही यावरून वाद-विवाद सुरू होते. तसेच, वंचितला आघाडीत घेण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात येत नव्हती. अखेर काल महाविकास आघाडीच्या झालेल्या बैठकीनंतर वंचितला महाविकास आघाडीत घेण्यास संबंधित पत्र जारी करण्यात आले आहे.
बैठकीत पुंडकर यांचा अपमान
मंगळवारी मुंबईमध्ये महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर उपस्थित राहिले होते. मात्र बैठक सुरू झाल्यानंतर पुंडकर यांना आघाडीने तासभर बाहेर उभे ठेवले, असा आरोप वंचितने केला. हे सर्व आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर शेवटी महाविकास आघाडीकडून वंचितचा मविआत समावेश करत असल्याचे पत्र जाहीर करण्यात आले. त्यामुळे आता अधिकृतरित्या वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा एक भाग बनली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीकडून जारी करण्यात आलेल्या पत्रात, “मुंबई येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामिल व्हावे, यावर शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले असून, त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला आहे.” असे म्हणले आहे. आता महाविकास आघाडीची पुढील बैठक 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या बैठकीत स्वतः प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत.