लंडन : वृत्तसंस्था – इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये टीम इंडियाने इतिहास घडवत इंग्लंडवर 157 रननी दणदणीत विजय मिळवला आहे. याचसोबत भारताने या सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सत्रामध्ये इंग्लंडने तब्बल 6 विकेट गमावल्या. लंचनंतर सुरुवातीलाच रविंद्र जडेजाने हसीब हमीदला बोल्ड केलं, तर जसप्रीत बुमराहने आपल्या भेदक रिव्हर्स स्विंगने ओली पोप आणि जॉनी बेयरस्टोला बोल्ड केलं. यानंतर जडेजाने पुन्हा मोईन अलीला शून्य रनवर माघारी पाठवलं. शार्दुल ठाकूरने मॅचमध्ये दुसऱ्यांदा जो रूटला बोल्ड केलं, तर उमेश यादवने क्रिस वोक्सला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
भारतीय संघानं दुसऱ्या डावात 466 धावा करताना विजयासाठी ठेवलेल्या 368 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामीवीरांनी शतकी भागीदारी केली. शार्दूल ठाकूरनं टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं. रोरी बर्न्स 125 चेंडूंत 5 चौकारांसह 50 धावा करून माघारी परतला. त्यानंतर डेवीड मलानसाठी DRS घेतला गेला, परंतु अम्पायर्स कॉलमुळे तो वाचला. त्याला या जीवदानाचा फायदा उचलता आला नाही आणि पुढील षटकात तो माघारी परतला. लंच ब्रेकनंतर भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली.
भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर बुमराह, जडेजा आणि शार्दुलला प्रत्येकी 2-2 विकेट घेण्यात यश आलं. 50 वर्षानंतर पहिल्यांदाच भारताला ओव्हलमध्ये विजय मिळाला आहे. 1971 साली भारताने ओव्हलमध्ये याआधी टेस्ट मॅच जिंकली होती. सीरिजची अखेरची टेस्ट 10 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. सीरिज वाचवण्यासाठी आता इंग्लंडला पुढची मॅच जिंकणं गरजेचं आहे.