नवी दिल्ली । इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या नावावर अनेक विक्रम आहेत. भारताविरुद्धच्या मालिकेच्या चौथ्या कसोटी सामन्यात मैदानावर प्रवेश करताच त्याने आणखी एक विक्रम केला. त्याने भारताच्या महान फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे टाकत आपल्या देशात सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम केला. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
अँडरसन त्याच्या कारकिर्दीतील एकूण 166 वा कसोटी सामना खेळायला घरच्या मैदानावर (इंग्लंडमध्ये) उतरला तेव्हा हा त्याचा 95 वा कसोटी सामना ठरला आहे. त्याच्या आधी सचिन तेंडुलकरने भारतात सर्वाधिक 94 कसोटी सामने खेळण्याचा विक्रम केला होता. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग ऑस्ट्रेलियामध्ये 92 कसोटी सामने खेळून या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.
इंग्लंडचे माजी कर्णधार एलिस्टर कुक आणि स्टीव्ह वॉ यांनी त्यांच्या घरच्या मैदानावर समान 89 कसोटी सामने खेळले आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार जॅक कॅलिस आपल्या देशात 88 कसोटी सामने खेळला आहे.
या सामन्यासाठी दोन्ही संघांमध्ये 2-2 बदल करण्यात आले. भारतीय संघात इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीची जागा उमेश यादव आणि शार्दुल ठाकूरने घेतली. तर इंग्लंडमध्ये, ओली पोप आणि ख्रिस वोक्स यांना जोस बटलर आणि सॅम करेनची जागा देण्यात आली आहे. पाच सामन्यांची मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत आहे.