नवी दिल्ली । भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हल (IND vs ENG Oval Test) मध्ये सुरू असलेल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी, बॉलिंग ऑलराउंडर शार्दुल ठाकूरने जलद अर्धशतक ठोकून टीम इंडियाला सन्मानजनक स्कोअर गाठून दिला. शार्दुलने आपल्या झटपट खेळीमुळे चाहत्यांच्या आणि भारतीय संघ व्यवस्थापनाच्या अपेक्षा पूर्ण केल्या. जेव्हा तो फलंदाजीसाठी मैदानावर आला, तेव्हा टीम इंडियाची स्थिती नाजूक होती. कसोटीच्या पहिल्याच दिवशी 6 फलंदाज 117 धावांच्या मोबदल्यात पॅव्हेलियनमध्ये परतले होते. संघावर स्वस्तात बाद होण्याचा धोका होता. पण शार्दुलने कोणत्याही इंग्लिश गोलंदाजाला त्याच्यावर वर्चस्व मिळवू दिले नाही आणि प्रत्येक गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला.
शार्दुलने मैदानाभोवती शॉट्स खेळले आणि धोकादायक दिसणाऱ्या ओली रॉबिन्सनच्या सलग दोन चेंडूंवर चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. शार्दुलने आपले अर्धशतक अवघ्या 31 चेंडूत पूर्ण केले. 36 चेंडूत 57 धावा केल्यावर तो बाद झाला. त्याच्या आणि विराट कोहलीच्या अर्धशतकांमुळे भारताने पहिल्या डावात 191 धावांचा टप्पा गाठला.
चाहत्यांनी शार्दुलसाठी मजेदार मीम्स शेअर केले
शार्दुलच्या या धडाकेबाज खेळीने सर्वांची मने जिंकली. माजी क्रिकेटपटूंशिवाय चाहत्यांनीही त्याचे जोरदार कौतुक केले आणि पुन्हा एकदा ‘लॉर्ड शार्दुल’ ट्विटरवर ट्रेंड करण्यास सुरुवात केली. एका युझरने शार्दुलच्या खेळीचे कौतुक करणारे एक मीम शेअर केले. त्यात असे लिहिले होते की,” क्रिकेटचा फक्त एक डॉन (ब्रॅडमन) आणि एक राजा (कोहली) आणि एक देव (सचिन तेंडुलकर) आणि एक लॉर्ड (शार्दुल) आहे.” दुसऱ्या युझरने शार्दुलचे लोकल ट्रेनमध्ये प्रवास करतानाचे जुने छायाचित्र शेअर केले.
त्याचबरोबर भारताचा माजी फलंदाज वसीम जाफरने वेब सीरिज घोटाळ्याचे एक मजेशीर मीम शेअर करून शार्दुलचे कौतुक केले.
शार्दुललाही हे नाव आवडते
‘लॉर्ड शार्दुल ठाकूर’ हे खरे नाव नसून ट्विटर ट्रेंड आहे. या वर्षी जेव्हा इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. तेव्हाच पहिल्यांदा चाहत्यांनी शार्दुलसाठी ट्विटरवर असा ट्रेंड सुरु केला. कारण त्याने इंग्लंडविरुद्ध 5 टी -20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत चांगली गोलंदाजी केली. त्याने मालिकेत अनेक प्रसंगी भागीदारी तोडली आणि दोन्ही मालिकांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज देखील ठरला. तेव्हापासून चाहते त्याच्यासाठी ट्विटरवर या नावाने मजेदार मीम्स शेअर करत आहेत. जेव्हाही तो चेंडू किंवा फलंदाजीने चांगला खेळ दाखवतो, तेव्हा ‘लॉर्ड शार्दुल ठाकूर’ ट्विटरवर ट्रेंड करायला लागतो.
चाहत्यांनी दिलेले हे नाव शार्दुललाही आवडते. चाहत्यांच्या मनात हे नाव कोठून आले हे मला माहित नाही असे त्याने आधीच सांगितले आहे. पण एक प्रकारे लोकं इतकी स्तुती करतात हे चांगले आहे. ते माझ्यावर प्रेम करतात आणि माझ्या कामगिरीवर लक्ष ठेवतात.