क्रीडानगरी | पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ३५ धावांनी विजय मिळवला. २५४ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ ४४.१ षटकात २१७ धावांवर गारद झाला. भारतातर्फे अंबाती रायुडू याने ९० तर हार्दिक पांड्या व विजय शंकर यांनी ४५ धावांच्या खेळ्या साकारल्या. भारताच्या डावाची सुरवात खराब झाली होती. अवघ्या २० धावांत ४ विकेट गमावल्यानंतर अंबाती रायुडू व विजय शंकर यांनी भारताच्या डावाला आकार दिला. यानंतर केदार जाधवनेही ३४ धावांची छोटी खेळी करुन सहकार्य केले. शेवटच्या ५ षटकांत हार्दिक पांड्याने केलेल्या फटकेबाजीने भारताने २५० धावांचा टप्पा ओलांडला.
न्यूझीलंडच्या डावाची सुरवातही खराब झाली. मोहम्मद शामी व हार्दिक पांड्यांच्या भेदक गोलंदाजीने सुरुवातीच्या ३ विकेट न्यूझीलंडने लवकर गमावल्या. त्यानंतर केन विल्यम्सन, टॉम लॅथम आणि जेम्स निशाम यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु ठराविक अंतराने विकेट्स पडत गेल्याने न्यूझीलंडचा डाव २१७ धावांवर आटोपला. भारतातर्फे मोहम्मद शामीने ३ तर युझवेंद्र चहल व हार्दिक पांड्याने २ विकेट घेतल्या. केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमार यांनी १ विकेट घेतली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने २१ एकदिवसीय सामन्यांतील आपला १९ वा विजय मिळवला.
इतर महत्वाचे –