कोलंबो : वृत्तसंस्था – भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असणाऱ्या वनडे सीरिजची तिसरी मॅच शुक्रवारी होणार आहे. या सीरिजमध्ये टीम इंडियाने 2-0ने विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसरी मॅच जिंकून टीम इंडिया श्रीलंकेला व्हाईट वॉश करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या सामन्यासाठी भारतीय टीममध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार या सामन्यातून ओपनर पृथ्वी शॉ आणि विकेट कीपर इशान किशन यांना विश्रांती दिली जाऊ शकते. शॉ आणि किशन यांनी पहिल्या सामन्यात आक्रमक बॅटिंग केली होती, पण दुसऱ्या मॅचमध्ये दोघंही खराब शॉट खेळून आऊट झाले होते.
उद्या होणाऱ्या अखेरच्या सामन्यात पृथ्वी शॉऐवजी ऋतुराज गायकवाड किंवा देवदत्त पडिक्कल यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. तर इशान किशनऐवजी संजू सॅमसनला खेळवण्यात येऊ शकते. तीन टी-20 मॅचच्या सीरिजआधी टीम इंडियाचा पृथ्वी शॉला आराम देण्याचा विचार आहे. संजू सॅमसन पहिल्या दोन वनडेमध्ये दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता, पण आता तो पूर्णपणे फिट असल्याचे समजत आहे.
जर इशान किशनला बाहेर बसवलं तर सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर तर संजू सॅमसन पाचव्या क्रमांकावर खेळेल. पहिल्या दोन वनडेमध्ये अपयशी ठरलेला मनिष पांडे हा चौथ्या क्रमांकावरच खेळणार आहे. हार्दिक पांड्याचा फिटनेस टीम इंडियासाठी सध्या चिंतेचं कारण आहे, कारण दुसऱ्या वनडेमध्ये बॉलिंग करताना पांड्याची कंबर दुखत होती. या शिवाय भारतीय टीममध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता कमी आहे.
भारताची संभाव्य टीम
शिखर धवन, देवदत्त पडिक्कल/ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, दीपक चहर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार