कराड | यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स आणि वेणूताई चव्हाण कॉलेजमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत संप पुकारला आहे. तिसऱ्या दिवशी या संपामध्ये कर्मचारी सहभागी झाले असून, त्यामुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाला आहे. संपावर तोडगा न निघाल्यास कामकाज ठप्प झाले असून, त्याचा परिणाम प्रशासकीय कामकाज व प्रयोगशाळेतील विद्यार्थ्यांवर होत आहे.
महाराष्ट्र राज्य अशासकीय विद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज ऑफिसर्स फोरम, महाराष्ट्र राज्य अशासकीय अनुदानित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी कृती समिती, महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन रजिस्टार असोसिएशन व आयटक संलग्न सोलापूर विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाने राज्यभर काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संघटनांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर गेल्या वर्षी कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र, त्यानंतर कुठल्याही समस्येवर राज्य सरकारने तोडगा काढला नाही. केवळ संघटनेने संघटनांचा वेळ मारून नेण्याची भूमिका ठेवल्यामुळे विद्यापीठ, तसेच महाविद्यालयीन कर्मचारी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारावर एकत्र येऊन काम बंद आंदोलन सुरू केले. संघटन शक्तीचे प्रदर्शन घडवित मागण्या मंजूर झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त केला. महाराष्ट्र महासंघ प्रतिनिधी नारायण मोरे, कोल्हापूर विभागीय महाविद्यालयीन संघटक सतीश डोंगरे, रवी पवार, विजय साळुंखे, गणेश पांढरपट्टे यांच्यासह दोन्ही महाविद्यालयांतील कर्मचाऱ्यांनी संपामध्ये भाग घेतला.