सांगली । नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भातली तारीख जाहीर करा, वैद्यकीय विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ करा यांसह प्रलंबित अन्य मागण्यांसाठी सांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालय तसेच मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता रुग्णालयातील सर्व विभाग यावेळी बंद राहणार आहेत. सांगली आणि मिरजेतील रुग्णालयाबाहेर मार्डच्या डॉक्टरांनी एकत्रित येत यावेळी शासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
जिल्ह्यातील 120 डॉक्टर संपामध्ये सहभागी झाले आहेत. सरकारी रुग्णालये आणि महाविद्यालयामधील ओपीडी, नॉन इमर्जन्सी वॉर्ड आणि निवडक सेवा न देण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिडेंट संघटनेच्या डॉक्टरांनी संप पुकारला आहे. डॉक्टरांनी पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ करावे, कोविड इन्सेन्टिव्ह आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उत्तम वसतिगृह सुविधा, जोपर्यंत नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भातली तारीख जाहीर होत नाही, तोपर्यंत संप सुरुच ठेवणार असल्याचा मार्डनं इशारा दिला आहे.
सेंट्रल मार्डन लवकरात लवकर नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भात निर्णय न झाल्यास महाराष्ट्रातील इमर्जन्सी सेवा आणि अतिदक्षता सेवेतील निवासी डॉक्टर्स देखील संपात सहभागी होणार आहेत. सांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालायसोर आज निवासी डॉक्टरांनी एकत्रित येत जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. मार्डचे जिल्हा अध्यक्ष डॉ. अक्षय सतई यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या संपामध्ये जिल्ह्यातील १२० निवासी डॉक्टर सहभागी झाले आहेत.