नवी दिल्ली । श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या सदस्यांनी पंतप्रधानांना भेटून अयोध्येत निर्माण होणाऱ्या राम मंदिराच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधानांनीही हे आमंत्रण स्वीकारले आहे. ट्रस्टच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जुलै रोजी म्हणजेच देव शयनी एकादशीच्या दिवशी पायाभरणी करण्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाने अद्याप ही तारीख निश्चित केलेली नाही.
उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथे राम मंदिराच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाची तयारी आता पूर्ण झाली आहे. राम मंदिर बांधण्यापूर्वी समतलीकरणाचे काम जवळपास पूर्ण होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठीच श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या सदस्यांनी पंतप्रधानांना भेटून राम मंदिराच्या शिलान्यास कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे.
म्हणून २ जुलै रोजी होऊ शकतो राम मंदिराचा शिलान्यास
येत्या २ जुलै रोजी हिंदु दिनदर्शिकेनुसार देव शयनी एकादशी आहे, अर्थात या नंतर देव झोपी जातात आणि ४ महिन्यांनंतर म्हणजेच कार्तिक महिन्यात देव उत्थान एकादशीच्या दिवशी जागृत होतात. या चार महिन्यांत हिंदूंमध्ये कोणतेही नवे किंवा शुभ कार्य केले जात नाही. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वेळापत्रक काही दिवस अत्यंत व्यग्र आहे. म्हणूनच आता देव शयनी एकादशीची वेळ जवळ येत असल्यामुळे यावेळी जर पायाभरणी केली गेली नाही तर मग पुढील चार महिने ते कार्य करणे शक्य होणार नाही, असे म्हटले जात आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in