नवी दिल्ली । देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. पंतप्रधान मोदी यांनीही यापार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊन १८ मे नंतरही सुरु राहणार असल्याचे सांगितले आहे. देशात सामान्य नागरिकांबरोबरच पोलीस, शासकीय अधिकारी आणि जवान हे सुद्धा कोरोनाचे शिकार झाले आहे. अशात कोरोनाची बाधा झालेल्या एका जवानाने रुग्णालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, सदर जवान अलवर येथे सिग्नल कोर्स येथे तैनात आहे. कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर त्याला दिल्ली येथील लष्कराच्या बेस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या घशातील नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. सदर जवानाने १२ मी रोजी पहाटेच्या वेळी रुग्णालयाच्या मागील बाजूला असणाऱ्या एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जवानांची ओळख पटली असून तो महाराष्ट्रातील असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, आत्महत्या केलेल्या जवानाला फुफ्फुसाचा कर्करोग होता. लष्कराच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. जवानाचा कोरोना चाचणीसाठी अहवाल पाठवला असता, तो संक्रमित असल्याचं समोर आलं आहे. त्या जवानाला ५ मे रोजी सैन्याच्या आर. आर. रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मृत जवानाचे कुटुंब अलवर येथे राहते. त्यांनाही घटनेची माहिती देण्यात आली आहे.