कर्णधार रोहित शर्माचा होणार सन्मान; MCA ने घेतला निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा कर्णधार आणि आक्रमक सलामीवीर रोहित शर्माचा मुंबई क्रिकेट असोसिएशन ( MCA) कडून सत्कार करण्यात येणार आहे. रोहित शर्मा च्या रूपाने मुंबईचा खेळाडू तिन्ही फॉरमॅट मध्ये देशाचा कर्णधार झाला आहे. त्यामुळेच त्याचा सत्कार करण्यात येणार आहे.

गुरुवारी झालेल्या एमसीएच्या शिखर परिषदेच्या बैठकीत रोहितचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिषदेच्या एका सदस्याने सांगितले, “आज सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत रोहित शर्माला तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार बनवल्याबद्दल त्याचा सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. रोहितने आत्तापर्यंत एकदिवसीय आणि T20 सामन्यात भारताचे कर्णधारपद भूषवले आहे आणि मार्च मध्ये तो कसोटी क्रिकेट मध्ये देशाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

रोहितशिवाय टीम इंडियामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादव आणि शार्दुल ठाकूर यांचाही गौरव करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अंडर-19 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सलामीवीर असलेल्या आंग्रश रघुवंशी यालाही एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.