रामदेवबाबांचे कोरोनावरील औषध म्हणजे आरोग्याशी खेळ, त्याला मान्यता दिली कुणी? ‘IMA’चा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । रामदेवबाबा यांच्या पतंजली कंपनीने तयार केलेल्या कोरोना प्रतिबंधक औषधाला इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या अधिकृत संघटनेने विरोध केला आहे. या औषधाला कुठल्याच मान्यताप्राप्त अधिकृत संघटनेकडून मान्यता मिळाली नाही, ती मिळाली असल्यास तसे सिद्ध करावे, अशीही मागणी ‘आयएमए’ने (IMA) केली असल्याचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने दिलंय. हा प्रकार पूर्णपणे सर्वसामान्यांची दिशाभूल करणारा व त्यांच्या आरोग्याशी खेळ करणारा आहे. जिथे लस येण्यासाठी इतक्या महिन्यांचा कालावधी लागला, तिथे हे औषध कसे उपलब्ध झाले? त्याला कुणी मान्यता दिली, असे प्रश्न आयएमएने उपस्थित केले आहेत.

या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयंत लेले यांनी तसा ई-मेल पाठवून विचारणा केली असता, या औषधाला अशी कुठल्याही प्रकारची मान्यता दिली नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने ट‌्वीट केले आहे. इतर कोणत्याही अधिकृत वैद्यकीय मान्यता देणाऱ्या संघटनांनीही मान्यता दिलेली नाही. तरीही अशी चुकीची व दिशाभूल करणारी माहिती का दिली जात आहे, अशा प्रश्न डॉ. लेले यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, ‘योग आणि आयुर्वेद यांना समांतर पातळीवर पुढे नेण्याचा प्रयत्न करणारे ‘कोरोनील’ हे औषध कोट्यवधी लोकांना जीवन देत आहे, तसेच वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे लोकांना ज्या शंका होत्या त्या दूर करण्यात आल्या,’ असा दावा पतंजलीकडून करण्यात आला होता, त्यात कोणता वैज्ञानिक आधार आहे याची माहिती द्यावी, अशीही मागणी आयएमएच्या राष्ट्रीय संघटनेने केली आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये हे औषध आणण्यात आले. सुरुवातीला रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे औषध असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र आता ते संपूर्ण करोनावर मात करणारे औषध म्हणून सांगितले जात आहे. या उद्घाटनाच्या कार्यक्रमात जे वैज्ञानिक लेखन सादर करण्यात आले, त्याला कोणता आधार होता, असाही प्रश्न उपस्थित करून ‘आयएमए’ने राष्ट्रीय आरोग्य संघटनेवर कडाडून टीकाही केली आहे.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

Leave a Comment