कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
प्रधानमंत्री जनधन योजनेच्या बचत खात्यामध्ये केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे तसेच प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आलेले पैसे पोस्टाच्या शाखेमधून तसेच ग्रामीण डाक सेवकाच्या माध्यमातून मिळण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबत 9 एप्रिल रोजी आदेश दिले होते. जी बचत खाती आधार क्रमांकाशी जोडलेली आहे. अशा खात्यावरील रक्कम बायोमेट्रीक यंत्राद्वारे पोस्ट कार्यालय किंवा ग्रामीण डाक सेवकाच्या माध्यमातून मिळणार आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँक वगळता सर्व बँकातील खातेधारक ज्यांच्या खात्याला आधार क्रमांक जोडलेला आहे, असे लाभार्थी पोस्ट कार्यालयामधून पैसे काढू शकतील. या प्रकारचे पैसे काढण्याची मर्यादा प्रतिदिन रुपये १० हजार फक्त (रु.10000/-) असणार आहे.
जिल्ह्यात एकूण 535 पोस्ट कार्यालय कार्यरत असून त्यापैकी 439 ग्रामीण भागामध्ये कार्यरत आहेत. या ग्रामीण पोस्ट कार्यालयामधून 674 प्रशिक्षित ग्रामीण डाकसेवक रक्कम अदा करण्यासाठी कार्यरत आहेत. आधार क्रमांकाशी जोडलेल्या कुठल्याही बँकेच्या बचत खात्यावरील व्यवहार या ग्रामीण डाक सेवकांकडून करता येणार आहेत. पोस्ट कार्यालयातर्फे या सुविधा, सध्या उपलब्ध असलेल्या बँक शाखा, एटीएम, व्यवसाय समन्वयक ग्राहक सेवा केंद्र व्यतिरिक्त राहतील.
आपल्या खात्यावर व्यवहार करण्यासाठी खातेदाराला त्याचे आधार कार्ड क्रमांक, बँक पासबूक व मोबाइल क्रमांक ग्रामीण डाक सेवकास द्यावा लागेल. याव्यवस्थेमुळे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना व प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचे लाभार्थी खातेदार या सर्वांची मोठी सोय होणार आहे, असे अग्रणी जिल्हा व्यवस्थापक राहुल माने यांनी सांगितले. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ग्रामीण डाक सेवकांनी आधार क्रमांक आधारित रकम अदा करण्याच्या सेवा सुरू केल्या आहेत. तरी सर्व बँकांचे लाभार्थी महिला व शेतकरी खातेदार ग्राहकांनी आपल्या खात्यावरून रकमा काढण्यासाठी आपण बँक शाखा, एटीएम, बीसी ग्राहक सेवा केंद्र तसेच आता पोस्ट बँक यांच्या सुविधेचा लाभ घ्यावा. कोणत्याही प्रकारे बँक शाखांमध्ये होणारी गर्दी टाळावी. आपली रक्कम बँक खात्यामध्ये सुरक्षित असून कोणताही लाभ परत जाणार नाही. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन जिल्हा अग्रणी प्रबंधक माने यांनी केले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”