नवी दिल्ली । बांग्लादेशात कोरोनाव्हायरसचा कहर पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. कोरोना विषाणूचा डेल्टा व्हेरिएन्ट तिथे वेगाने पसरत आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी तेथील सरकारने शुक्रवारी 23 जुलै रोजी 14 दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर केला. दरम्यान, बांगलादेशच्या मदतीसाठी भारतीय रेल्वे पुढे आली आहे.
बांगलादेशला मदत करण्यासाठी, भारतीय रेल्वे रविवारी ऑक्सिजन एक्सप्रेस ट्रेनमार्फत 200 टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची डिलिव्हरी करेल. असे पहिल्यांदाच घडत आहे कि, हा जीव वाचवणारा गॅस देशाबाहेर पाठविला जात आहे. शनिवारी झारखंडमधील टाटानगरहून निघालेली ही 10 डब्यांची रेल्वे रविवारी बांगलादेशच्या बेनापोल येथे पोहोचेल.
रेल्वेने सांगितले की, टाटानगरहून 200 मेट्रिक टन लिक्विड वैद्यकीय ऑक्सिजन घेऊन ऑक्सीजन एक्सप्रेस पहिल्यांदाच बांगलादेशला रवाना झाली. उद्या सकाळी हि रेल्वे तिथे पोहोचण्याची शक्यता आहे.
24 एप्रिलपासून सुरू झाली ऑक्सिजन एक्सप्रेस
भारतातील कोरोना साथीच्या दुसर्या लाटेदरम्यान, रेल्वेने ऑक्सिजन एक्सप्रेसचे काम राज्यातील ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी सुरू केले. 24 एप्रिल 2021 रोजी ही मोहीम सुरू झाल्यापासून रेल्वेने अशा 480 गाड्या चालवल्या आहेत आणि देशाच्या विविध भागात 38,841 टन ऑक्सिजन डिलिव्हरी केला आहे.