Indian Railways | भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सतत नवनवीन प्रयोग करता दिसत असते. आता देखील रेल्वे विभागाने, मजूर आणि कामगार वर्गाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नॉन-एसी, सामान्य श्रेणीच्या गाड्या सुरू करण्याची योजना आखली आहे. लवरकच मजूर आणि कामगारांसाठी स्पेशल ट्रेन सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. या विशेष ट्रेन, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओरिसा, पश्चिम बंगाल, पंजाब, आसाम, गुजरात, दिल्ली, तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये धावणार आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, जनरल ट्रेनसाठी अनेक प्रवाशांना दीर्घकाळ वाट बघावी लागते. तसेच ट्रेनने प्रवास करणाऱ्या कामगार श्रमिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कामगार वर्गासाठी स्पेशल ट्रेन सुरू करण्यात यावी असा विचार रेल्वे विभागाने केला आहे. यापूर्वी अशा विशेष ट्रेन केवळ सणासुदीच्या काळात किंवा गर्दीच्या हंगामात सुरू केल्या जात होत्या. मात्र आता, प्रवासी गाड्यांमध्ये होणारी गर्दी चिंतेचा विषय बनत असल्याने अशी व्यवस्था कायमस्वरूपी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
जानेवारी 2024 पासून सुरु होणार श्रमिक ट्रेन – Indian Railways
रेल्वे विभागाकडून या स्पेशल ट्रेनची सेवा जानेवारी 2024 पासून देण्यात येणार आहे. या नवीन श्रमिक ट्रेनमध्ये नॉन-एसी एलएचबी कोच असतील. तसेच त्यात फक्त स्लीपर आणि सामान्य श्रेणी सेवा असतील. अद्याप या विशेष ट्रेनला रेल्वे विभागाने (Indian Railways) कोणतेही खास नाव दिलेले नाही. मात्र तेही लवकरच देण्यात येणार आहे. यापूर्वी कोरोना काळात असा उपक्रम राबविण्यात आला होता. आता असाच उपक्रम उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओरिसा, पश्चिम बंगाल, पंजाब, आसाम, गुजरात, दिल्ली, तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. या सर्व राज्यांमध्ये ट्रेनने प्रवास करणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. अनेक वेळा ट्रेन उशिरा आल्यामुळे किंवा ट्रेन मधल्या गर्दीमुळे कामगारांना वेळेत पोहचता येत नाही. त्यामुळेच त्यांच्या या सर्व बाबींचा विचार करून भारतीय रेल्वे विभागाने श्रमिक ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.