अन्नू राणीने पटकावले ऑलिम्पिकचे तिकीट, शेतात शिकली होती भालाफेक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मेरठ येथील भालाफेकपटू अन्नू राणी हिने जागतिक अ‍ॅथलेटिक्स रँकिंग सिस्टमच्या आधारावर टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट पटकावले आहे. अन्नू राणीला ऑलिम्पिक तिकीट मिळाल्यानंतर तिच्या गावात म्हणजेच बहादुरपूर येथे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अन्नू राणीने १२ वर्षांच्या कारकिर्दीत आर्थिक समस्येवर मात करून आपल्या दमदार कामगिरी करत ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे. तिने नुकतेच ६३.२४ मीटर भालाफेक करून राष्ट्रीय विक्रमाची नोंद करत सुवर्णपदक जिंकले होते. पण, ऑलिम्पिक पात्रतेसाठीचे अंतर .७७ मीटरने हुकले होते. जागतिक क्रमवारीच्या आधारावर तिला ऑलिम्पिक तिकीट मिळाले आहे.

अन्नू राणीने आपल्या कारकिर्दीत २०१४च्या आशियाई स्पर्धेत कांस्य, २०१५च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य, २०१७च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे. तसेच जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तिने आतापर्यंत ८ वेळा राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली आहे.

शेतकरी अमरपाल सिंह यांच्या घरी जन्मलेली अन्नू ही पाच बहिण-भावंडांमध्ये सर्वात लहान आहे. अमरपाल हे स्वतः गोळाफेकपटू होते.अन्नू राणी हिने त्यांच्याकडूनच प्रेरणा घेत खेळाच्या मैदानावर पाऊल ठेवले. सुरुवातीला ती भालाफेकसोबतच गोळाफेकसुद्धा करायची. पण नंतर तिने भालाफेक करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा वडिलांना दीड लाखांचा भाला घेऊन देता आला नव्हता.अन्नूने २५०० रुपयाचा पहिला भाला खरेदी केला. यानंतर तिने कधीच मागे वळून पहिले नाही. ती आपल्या शेतात भालाफेकीचा सराव करायची.

Leave a Comment