हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फिरकी गोलंदाज पूनम यादवच्या तीन बळींच्या जोरावर भारताने मंगळवारी आयसीसी महिला टी -२० विश्वचषक सराव सामन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध दोन धावांनी रोमांचक विजय नोंदविला. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय महिला संघ प्रथम फलंदाजीस उतरला आणि वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघासमोर विजयासाठी निर्धारित २० षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात १०७ धावांची नोंद केली. लक्ष्य थोडे होते पण भारताच्या गोलंदाजीपुढे वेस्ट इंडीजचा संघ २० षटकांत सात गडी राखून १०५ धावाच करू शकला.पूनमने चार षटकांत २० धावा देऊन तीन गडी बाद केले.
सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ चांगल्या स्थितीत होता, त्याने १३ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात ५७ धावा केल्या होत्या. दीप्ती शर्माने सलामीवीर ली-अॅन कर्बी ४२ बाद केल्यामुळे त्यांचा डाव गडगडला. त्यानंतर लवकरच कर्णधार स्टीफनी टेलर १६, चेडिन नेशन ० आणि डान्ड्रा डॉटिन ०१ हेही पॅव्हेलियनमध्ये परतले आणि संघाने १७ व्या षटकात पाच बाद ६७ धावा केल्या. १९ व्या षटकात हेली मॅथ्यूज २५ आणि चिन्ले हेन्री १७ यांनी तीन चौकार व एक षटकार ठोकला आणि त्यानंतर विजयासाठी वेस्ट इंडीजला शेवटच्या सहा चेंडूंत ११ धावा कराव्या लागल्या. हेन्रीने पूनमला चौकार ठोकला पण या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मॅथ्यूज बाद झाली. शेवटच्या बॉलवर जिंकण्यासाठी तीन धावांची आवश्यकता होती, परंतु हेन्रीला वेदा कृष्णमूर्तीने झेलबाद केले.
तत्पूर्वी भारताची आघाडीची फळीही कोलमडून गेली. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूपर्यंत संघाने १७ धावा करून तीन गडी गमावले. सलामीवीर स्मृती मंधाना ०४ फक्त सहा चेंडू खेळू शकली तर जेमिमा रोड्रिग्ज ० खाते उघडण्यात अपयशी ठरली. तरुण शेफाली वर्मानेही दोन चौकार लगावून शामिलिया कोन्नेलच्या चेंडूवर बाद झाली. कर्णधार हरमनप्रीत कौर ११ आणि वेदा ०५ देखील प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले. दीप्ती शर्मा २१ आणि लोअर ऑर्डरच्या फलंदाज पूजा वस्त्रकार १३ आणि तानिया भाटिया १० यांनी काही धावा फटकावल्या. शिखा पांडेने १६ चेंडूंत २४धावांची नाबाद खेळी करून संघाची धावसंख्या १०० पर्यंत नेली.यामध्ये तीने तीन चौकार आणि एक षटकार लगावला.