हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नवनियुक्त भारतीय कुस्ती संघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्ती सोडत असल्याचे जाहीर केले होते. तिने घेतलेल्या या निर्णयानंतर भाजप सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. तसेच राजकिय वर्तुळात कुस्ती संघाबद्दल नवा वाद निर्माण झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर रविवारी भारतीय क्रीडा मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आज मंत्रालयाने नवनियुक्त भारतीय कुस्ती संघाला बरखास्त केले आहे. तसेच, अध्यक्ष संजय सिंह यांनी घेतलेले सर्व निर्णयही रद्द करत त्यांना निलंबित केले आहे.
भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत संजय सिंह निवडून आल्यानंतर त्यांना अध्यक्षपदाचे स्थान दिले जाणार हे निश्चित होते. तेव्हापासूनच खेळाडूंनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला होता. तसेच, कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर बजरंग पुनिया याने देखील आपला पद्म पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठेवला होता. देशामध्ये या सर्व घडामोडी झाल्यानंतर केंद्र सरकारने थेट भारतीय कुस्ती संघाला बरखास्त केले आहे. आता पुढील आदेश येईपर्यंत कुस्ती महासंघावर निलंबनाची कारवाई कायम राहणार आहे.
दरम्यान, कुस्तीपटू साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक खेळाचे आरोप केले होते. याप्रकरणी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती. परंतु तरी देखील ब्रिजभूषण यांच्या विरोधात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. याउलट ब्रिजभूषण यांचे निकटवर्ती संजय सिंह यांची भारतीय कुस्ती संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर साक्षी मलिकने आपली निवृत्ती जाहीर केली.