हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून भारताने चीनला मागे टाकलं आहे. ब्लूमबर्गने वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूच्या अंदाजाचा हवाला देत याबाबत अहवाल दिला आहे. संस्थेच्या अंदाजानुसार, 2022 च्या अखेरीस भारताची लोकसंख्या 1.417 अब्ज होती. त्याचवेळी चीनने नोंदवलेल्या आकडेवारी नुसार त्यांची लोकसंख्या 1.412 अब्ज होती. म्हणजेच भारताची लोकसंख्या चीनपेक्षा 5 दशलक्ष अधिक आहे.
ब्लूमबर्गने यावेळी संशोधन प्लॅटफॉर्म मॅक्रोट्रेंड्सचाही अहवाल दिला. त्या अहवालानुसार, सध्या भारताची लोकसंख्या 1.428 अब्ज आहे. भारताची लोकसंख्या वाढ मंदावली असली तरी किमान 2050 पर्यंत ही संख्या वाढत राहण्याची अपेक्षा आहे असे जागतिक लोकसंख्या पुनरावलोकनाने म्हटले आहे. दुसरीकडे, नॅशनल स्टॅटिस्टिक्स ब्युरोने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, वर्षभरापूर्वीच्या तुलनेत 2022 मध्ये चीनची लोकसंख्या 8,85,000 ने कमी झाली.
याशिवाय, युनायटेड नेशन्सच्या अंदाजानुसार, 2022 ते 2050 या कालावधीतील जागतिक लोकसंख्येतील अंदाजे वाढीपैकी निम्म्याहून अधिक लोकसंख्या फक्त काँगो, इजिप्त, इथियोपिया, भारत, नायजेरिया, पाकिस्तान, फिलीपिन्स आणि टांझानिया या 8 देशांमध्ये असेल.
चीनने 2021 मध्ये त्यांचे एक मूल धोरण मागे घेतले असले तरीही चीनच्या लोकसंख्येमध्ये घट नोंदवण्यात आली. चीनमध्ये तब्बल 60 वर्षानंतर प्रथमच लोकसंख्येत घट झाली आहे. 1980 मध्ये चीनमध्ये एक मूल धोरण अमलात आणले होते ज्याचे मुख्य उद्दिष्ट हे लोकसंख्या वाढीवर निर्बंध आणून त्याचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम कमी करणे हे होते. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह कडक अंमलबजावणीही करण्यात आली. परंतु आता मात्र बीजिंग आपली लोकसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठीच अधिक जन्मांना प्रोत्साहन देण्यासाठी चीनमध्ये कर कपात, दीर्घ प्रसूती रजा आणि गृहनिर्माण सबसिडी ऑफर केली जात आहे.